इंदापुरात तब्बल १०० किलो गांजा पकडला; तस्करीबाबत मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:53 IST2025-11-08T15:51:46+5:302025-11-08T15:53:20+5:30
बावडा येथून बारामती मार्गे जाणाऱ्या एका चार चाकी वाहनात अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती

इंदापुरात तब्बल १०० किलो गांजा पकडला; तस्करीबाबत मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
वालचंदनगर: कळंब (ता. इंदापूर) येथील बी. के. बी. एन. रस्त्यावरील डीपी चौकात महसूल विभाग व वालचंद नगर पोलीसांनी शुक्रवारी(दि ७) पहाटे चार चाकी गाडीचा पाठलाग करत १०० किलो गांजा पकडला. यावेळी केलेल्या कारवाईत गांजा आणि कारसह २९ लाख ९८ हजार पाचशे रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.
वालचंदनगर पोलिसांनी सांगितले की, बावडा येथून बारामती मार्गे जाणाऱ्या एका चार चाकी वाहनात अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर शिताफीने सापळा रचत कळंब येथील डीपी चौकात होंडा सिटी पकडून त्याची पाहणी केली. यावेळी कारमध्ये २४ लाख ९८ हजार ५०० किंमतीचा गांजा, ५ लाखांच्या कारसह २९ लाख ९८हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे व वालचंदनगर पोलिसांनी हा माल ताब्यात घेतला. कारवाईत ४ आरोपी ताब्यात घेतले असून २ आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींमध्ये फिरोज अजिज बागवान (वय ३६, रा. कसबा बारामती), प्रदीप बाळासो गायकवाड (वय २८ ,रा. मळद,ता. बारामती) व मंगेश ज्ञानदेव राऊत(वय २९ , रा. मळद) यांचा समावेश आहे. तसेच तीन फरार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींना इंदापूर येथील न्यायालयाने १२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि ८) सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डोनगे यांनी फरार आरोपी अश्रम अजिज सय्यद (वय २९, रा. निरावागज ता. बारामती) याला पकडले आहे.
या टोळीचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी संबंध असून अमली पदार्थ तस्करी बाबतचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण रमेश चोपडे, बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे, पोलीस हवालदार गणेश काटकर ,उत्तम खाडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किसन बेलदार ,शरद पोफळे ,सचिन गायकवाड ,महेश पवार, अभिजीत कळसकर,गणेश बनकर ,राहुल माने ,ओंकार कांबळे यांनी हि कामगिरी केली. नागरिकांमध्ये सात आरोपींची चर्चा असताना या गुुन्ह्यात सहा आरोपी असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांनी दिली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.