लग्नाचे आमिष दाखवून १० लाख उकळले; मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:57 IST2025-01-21T09:56:49+5:302025-01-21T09:57:03+5:30
तरुणाने लग्न झाले असतानाही विवाहाच्या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून नोंदणी केली, नंतर तरुणीला फसवून १० लाख उकळले

लग्नाचे आमिष दाखवून १० लाख उकळले; मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
पुणे: पहिले लग्न झाले असतानाही लग्न जमवणाऱ्या वेबसाईटवर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी १० लाख रुपये घेतले. काही दिवसांनंतर तिला आपले आधीच लग्न झाले असून, पत्नी गर्भवती आहे असे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोपट बाबूराव फडतरे (वय ५८, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी कुलदीप आदिनाथ सावंत (३०, रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीत ७ जानेवारी रोजी घडली होती. पल्लवी पोपट फडतरे (२५) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी कुलदीप सावंत याने लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे भासवून नोंदणी केली. फिर्यादी यांना तो देहू येथे समक्ष जाऊन भेटला. फिर्यादी यांना त्याचे वागणे व आरोपीचा दवाखाना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी कुलदीपला नकार कळवला होता. असे असताना फिर्यादींच्या अपरोक्ष त्याने त्यांची मुलगी पल्लवीशी संपर्क साधला. तिला लग्नाचे आमिष दाखवले. पल्लवी ही बीएमएसएच झाली असून, तिचे क्लिनिक आहे. कुलदीपने तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करत, तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिने लग्नाचा विषय काढल्यावर आपले लग्न झाले असून, आपली पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला.
तिने त्याच्याकडे १० लाख रुपये परत करण्याची मागणी केली. परंतु, तो टाळाटाळ करू लागला. तेव्हा तिने चिठ्ठी लिहून आपल्या क्लिनिकमध्ये विषारी औषध घेतले. ही बाब समजल्यावर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना ८ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी कुलदीप याच्यावर विश्वासघात, फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.