बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली?; काँग्रेसचा कंगनावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 07:48 PM2020-09-14T19:48:48+5:302020-09-14T19:54:40+5:30

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा अजेंडा उघड; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

why kangana ranaut left mumbai without giving information of bollywoods drug connection asks congress | बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली?; काँग्रेसचा कंगनावर निशाणा

बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली?; काँग्रेसचा कंगनावर निशाणा

googlenewsNext

मुंबई: मुंबईला वाट्टेल ते बोलणारी ड्रामेबाज नटी मुंबईत येण्याआधी फारच फुशारक्या मारत होती. बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन संदर्भात आपल्याकडे माहिती आहे असेही ती तावातावाने सांगत होती. महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याची भाषा करत मुंबईत येऊन या नटीने तमाशाही केला. परंतु ड्रग संदर्भातील कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच परत का गेली, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

हाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

कंगनाचा समाचार घेताना सावंत म्हणाले की, बॉलिवूडचे ड्रग माफिया कनेक्शन व त्यासंदर्भातील गुन्ह्यांची माहिती तिच्याकडे आहे असे कंगनाने जाहीरपणे सांगितले होते. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबी याप्रकरणी चौकशी करत होती. त्यांच्याकडे कंगनाने ड्रग संदर्भातील माहिती देणे उचित होते. परंतु या नटीने कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली. मुंबई पोलीस याचा त्यावेळी तपास करत नव्हते. कंगनाकडे बॉलिवूड व ड्रग कनेक्शनची जी माहिती आहे ती तीने एनसीबीकडे द्यावी अशी आम्ही मागणीही केली होती. पण मुंबईत काही दिवस राहून कंगनाने ही माहिती दिली नाही हे आश्चर्यकारक असल्याचे सावंत म्हणाले.

मुंबईतून जाता जाता कंगना राणौतची शेरोशायरी; PoKवरून हटेना, टार्गेट शिवसेना!

एखाद्या गुन्ह्याची माहिती दडवणे हे आयपीसीच्या कलम १७६ व २२० व एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा ठरते व नागरिक कर्तव्याचे ते हनन ठरते याची कंगनाला माहिती असावी आणि तरीही ती माहिती न देता हिमाचल प्रदेशकडे परत गेली. यातून कंगना फक्त नौटंकी करण्यात माहिर असून तेवढ्यासाठी मुंबईत येऊन तमाशा करुन परत गेली असे म्हणण्यास वाव आहे, असे सावंत म्हणाले.

बिहार निवडणुकीत कंगना राणौत भाजपाची स्टार प्रचारक होणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

कंगनाकडे ड्रग कनेक्शन संदर्भात असलेली माहिती ती देण्यास तयार आहे आणि ही माहिती दिली तर अनेकांचे पितळ उघडे पडेल, तसे होऊ नये या भीतीपोटीच कंगनाला वेगवेगळ्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचे महाराष्ट्रातील भाजप नते म्हणत होते. महाराष्ट्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याबद्दल एकेरी भाषा तर तिने वापरलीच. पण मुंबई पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंतही मजल गेली. तिच्याकडे जर काही माहिती आहे तर मुंबईत काही दिवस राहून कंगणाने तिच्याकडील ड्रग माफियांची माहिती का दिली नाही. या सर्व प्रकरणातून कंगणा ही भाजपाची कठपुतली असून महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या कटाचा ती भाग आहे, हे आता स्पष्ट झाले, असेही सावंत म्हणाले.

घरी परतताच कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुंबईतून घरी परतलेल्या कंगनानं ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. तिनं ट्विटमध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे. 'मी मुव्ही माफिया, सुशांतचे मारेकरी आणि ड्रग रॅकेटला उघडं पाडतेय, हीच गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी त्रासदायक ठरतेय. मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र आदित्य ठाकरे ज्यांच्यासोबत फिरतात, त्यांना मी उघडं पाडतेय, हीच त्यांची समस्या आहे. हाच माझा सर्वात मोठा गुन्हा आहे,' असं ट्विट कंगनानं केलं आहे. 



याआधी कंगनानं शिवसेनेचा उल्लेख सोनिया सेना असा करत त्यांच्यामुळेच मुंबई सुरक्षित नसल्याचं म्हटलं होतं. 'चंदिगढमध्ये उतरताच माझी सुरक्षा नाममात्र राहिली आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. यावेळी मी वाचले, असं वाटतं. एक दिवस होता, जेव्हा मुंबईत आईच्या कुशीत उबदारपणा जाणवत होता आणि आज असा दिवस आहे, जेव्हा जीव वाचला म्हणजे खूप काही मिळाल्यासारखं वाटत आहे. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशत माजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला आहे,' अशा शब्दांत कंगनानं शिवसेनेला लक्ष्य केलं होतं.

Web Title: why kangana ranaut left mumbai without giving information of bollywoods drug connection asks congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.