Which is the biggest party in Gram Panchayat Election? Shiv Sena, BJP, NCP | सर्वात मोठा पक्ष कोणता? शिवसेना, भाजप की राष्ट्रवादी; ग्रा.पं.चे आकडे स्पष्ट

सर्वात मोठा पक्ष कोणता? शिवसेना, भाजप की राष्ट्रवादी; ग्रा.पं.चे आकडे स्पष्ट

मुंबई : राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. मात्र, कोणाच्या पारड्यात किती ग्राम पंचायती याचा आकडा मंगळवारी जवळपास स्पष्ट झाला आहे. छोटा भाऊ, मोठा भाऊ यातून पणाला लागलेली प्रतिष्ठा, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी जुळलेली सत्तेची समीकरणे यामुळे ही निवडणूक महत्वाची झाली होती. आता पुढील काही दिवस आम्हीच जास्त ग्रामपंचायती जिंकल्या असे दावे-प्रतिदावे केले जातील. परंतू आज सकाळी आलेली आकडेवारी यावर प्रकाश टाकणारी आहे. 


निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले असले तरी या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील आघाड्यांनीच बाजी मारल्याचे दिसून आले. आमदार-खासदारांपैकी बहुसंख्य लोकप्रतिनिधींना आपापली गावे राखली. मात्र काही गावात नेत्यांना मतदारांनी अनपेक्षित धक्केही दिले. खरेतर ही निवडणूक पक्ष पुरस्कृत, आघाडी पुरस्कृत गाव पॅनेलची. यामुळे येथे आमदार, खासदारांची पॅनेल उभी असतात. यामुळे विजय, पराजय हा त्या त्या आमदार किंवा पॅनलचा असतो. परंतू नंतर जेव्हा गोळाबेरीज केली जाते तेव्हा पक्षाचा विचार केला जातो. 


यानुसार सत्ताधारी शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेनेने 3113 ग्राम पंचायतींवर भगव फडकविला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक आमदार असलेला पक्ष भाजपा आहे.  भाजपाने 2632 ग्राम पंचायतींवर विजय मिळविला आहे. यानंतर राज्यात सत्तास्थापनेत आणि चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीचा नंबर लागतो. राष्ट्रवादीच्या पारड्यात 2400 ग्राम पंचायती आल्या आहेत. काँग्रेसने पहिल्या क्रमांकाचा दावा केला असला तरीही त्यांच्या पारड्यात 1823 ग्राम पंचायती आल्या आहेत. तर राज ठाकरेंच्या मनसेला 36 ग्राम पंचायती मिळाल्या आहेत. अपक्ष आणि स्थानिक विकास आघाड्यांना 2344 ग्राम पंचायती जिंकता आल्या आहेत. ही आकडेवारी आजतकने दिली आहे. 


बिनविरोध मिळालेल्या ग्रा. पंचायती
निवडणूक बिनविरोध करण्यात स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली असली तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या पक्षांच्या ताब्यात किती बिनविरोध ग्रामपंचायती गेल्या हे पाहणे औत्सुक्याचे आहे. स्थानिक आघाड्यांना 520 ग्राम पंचायती बिनविरोध करता आल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून एकमेकांचे वैरी बनलेल्या शिवसेना भाजपामध्ये खरी चुरस आहे. मोठा कोण हे दाखविण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला जाणार आहे. तुर्तास शिवसेनेकडे जास्त ग्राम पंचायती आहेत. शिवसेनेकडे २७८ तर भाजपाकडे २५७ ग्राम पंचायती आल्या आहेत. यापाठोपाठ राष्टवादीकडे २१८ ग्रामपंचायती तर काँग्रेसकडे १२४ ग्राम पंचायती आल्या आहेत. मनसेकडे ५ ग्राम पंचायती आहेत. 

आता सरपंचपदाच्या सोडतीकडे लक्ष
आज निकाल लागलेल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक महिन्याच्या आत सरपंचपदाचे आरक्षण काढणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. बोगस दाखले काढून निवडणूक लढवली जात होती, सरपंच पदाची सोडत निवडणुकीनंतर करण्याच्या निर्णयामुळे या प्रकाराला आळा बसला तसेच मतदानाची टक्केवारी देखील वाढली असे ते म्हणाले.

Web Title: Which is the biggest party in Gram Panchayat Election? Shiv Sena, BJP, NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.