"थोडी प्रतिक्षा करा व काय घडते आहे ते पाहा"; काँग्रेसच्या नाराज नेत्यांची लवकरच बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:22 AM2020-08-29T02:22:28+5:302020-08-29T07:25:53+5:30

काँग्रेसने दहा नेत्यांची एक समिती स्थापन केली. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी पाच काँग्रेस खासदारांना या समितीत घेण्यात आले. त्यात राहुल गांधी समर्थकांचा भरणा आहे.

"Wait a minute and see what happens"; A meeting of disgruntled Congress leaders soon | "थोडी प्रतिक्षा करा व काय घडते आहे ते पाहा"; काँग्रेसच्या नाराज नेत्यांची लवकरच बैठक

"थोडी प्रतिक्षा करा व काय घडते आहे ते पाहा"; काँग्रेसच्या नाराज नेत्यांची लवकरच बैठक

Next

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी पक्षसंघटनेत मोठे बदल करण्याचा आग्रह धरणारे व त्यासाठी संघर्ष करणाऱ्या २३ नेत्यांनी मांडलेले मुद्दे पक्षश्रेष्ठींनी फारसे विचारात न घेतल्याने हे नेते विलक्षण नाराज झाले आहेत. त्यामुळे आपले पुढचे पाऊल काय असावे हे ठरविण्यासाठी या नाराज नेत्यांची पुढच्या आठवड्यात एक बैठक होणार असल्याचे कळते.

काँग्रेसने दहा नेत्यांची एक समिती स्थापन केली. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी पाच काँग्रेस खासदारांना या समितीत घेण्यात आले. त्यात राहुल गांधी समर्थकांचा भरणा आहे. या सर्व बाबी नाराज नेत्यांना खटकल्या आहेत. पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याकरिता काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर दबाव आणण्याच्या दृष्टीने नाराज नेते नवी रणनीती आखत आहेत असे या नेत्यांच्या निकटवतीर्यांनी सांगितले.

संसदेचे आगामी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल घडावेत यासाठी नेमके काय करता येईल याबाबत या नाराज नेत्यांमध्ये दररोज चर्चा सुरू आहे. अशा संवादासाठी या नेत्यांनी एक गट स्थापन केला असून त्यामध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदर सिंह हूडा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी यांचा समावेश आहे. या गटातील नेत्यांची पुढील आठवड्याच्या प्रारंभी एक बैठक होणार असून त्यात भविष्यातील रणनीती ठरविली जाईल.

लोकसभेत काँग्रेसच्या उपनेतेपदी मनीष तिवारी किंवा शशी थरूर यांना डावलून तुलनेने नवीन असलेले खासदार गौरव गोगोई यांची निवड करण्यात आली हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना फारसे आवडलेले नाही. दररोजच्या टिष्ट्वटमुळे पक्ष मजबूत होणार नाही. नाराज नेत्यांपैकी एका नेत्याने लोकमतला सांगितले की, लोकसभा व राज्यसभेसाठी पक्षश्रेष्ठींनी ज्या पद्धतीने दोन समित्या स्थापन केल्या, त्यामुळे आम्ही नाखूष आहोत. राहुल गांधी रोज करत असलेल्या टिष्ट्वटमुळे पक्षाला उर्जितावस्था प्राप्त होणार नाही. या टिष्ट्वट्नी अथवा तळागाळातील कार्यकर्त्यांनी केलेले काम यापैकी कशामुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल हेही आम्हाला पाहायचे आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी दररोज संवाद साधावा अशी पक्षकार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. तशी कृती पक्षाकडून होते का याची आम्ही वाट पाहात आहोत.
गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल हे पक्षसंघटनेबाबत त्यांची मते प्रसारमाध्यमांद्वारे मांडून काँग्रेस अध्यक्षांवरील दबाव वाढवत आहेत. पक्षश्रेष्ठींना नाराज नेत्यांनी पाठविलेल्या पत्राचा मसुदा तयार करणारे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना पक्षातील सध्याच्या वातावरणाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, थोडी प्रतिक्षा करा व काय घडते आहे ते पाहा.

बिहारमधील काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख अखिलेश प्रसाद यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींना पाठविलेल्या पत्रावर मीही स्वाक्षरी केली आहे. आम्ही बिहारमधील विधानसभा निवडणुका जिंकू शकतो पण त्यासाठी योग्य दिशेने कृती झाली पाहिजे.

पत्रावर स्वाक्षरी करणारे काँग्रेसमधील २३ नेते
काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य : गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, जितीन प्रसाद
माजी मुख्यमंत्री : भूपिंदरसिंह हुडा, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चौहान, राजिंदरकौर भट्टल
राज्यसभेचे खासदार : कपिल सिब्बल, विवेक तनखा, अखिलेश प्रसाद सिंह
लोकसभेचे खासदार : मनीष तिवारी, शशी थरूर
माजी मंत्री : पी. जे. कुरियन, रेणुका चौधरी
माजी मुख्यमंत्री, मंत्र्यांचे पुत्र : संदीप दीक्षित, अजय सिंह, मिलिंद देवरा
माजी प्रदेशाध्यक्ष : राज बब्बर (उत्तर प्रदेश), अरविंदर सिंह लव्हली (दिल्ली), कौल सिंग ठाकूर (हिमाचल प्रदेश), हरयाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष कुलदीप शर्मा, दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री.

Web Title: "Wait a minute and see what happens"; A meeting of disgruntled Congress leaders soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.