veer savarkar row shivsena hit back to bjp sanjay raut ask why didnt they give him bharat ratna | इतका पुळका आहे, तर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?; शिवसेनेचा भाजपला सवाल

इतका पुळका आहे, तर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?; शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण करत भाजपचा जोरदार समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आलेल्या या मेळाव्यातील भाषणावर आता भाजपनं जोरदार टीका केली आहे. सावरकर सभागृहात भाषण करणारे मुख्यमंत्री सावरकरांबद्ल एकही शब्द का बोलले नाहीत? बहुधा त्यांना त्यांच्या नव्या मित्रांची भीती वाटत असावी, अशा शब्दांत भाजपनं मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं. भाजपकडून होत असलेल्या या टीकेला आता शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या अपमानावर शिवसेना कधीही गप्प बसलेली नाही आणि यापुढेही बसणार नाही. त्यासाठी हवं तर इतिहास चाळून पाहा. सावरकर शिवसेनेचे आदर्श आणि मार्गदर्शक आहेत. सावरकरांवरून शिवसेनेला प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी शिवसेनेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं संजय राऊत म्हणाले. 'सावरकरांचा पुळका असल्याचं दाखवणारे त्यांना भारतरत्न का देत नाहीत? गेल्या ६ वर्षांत अनेकांना भारतरत्न दिले गेले. मग सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? त्यात कोणत्या अडचणी येत आहेत?', असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले.
सावरकरांवरून शिवसेना वि. भाजप सामना
उद्धव यांनी सावरकर सभागृहातून भाषण केलं. पण त्यांच्या भाषणात सावरकरांबद्दल एकही शब्द नव्हता. बहुधा त्यांना त्यांच्या नव्या मित्रांची भीती वाटत असावी, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली. हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिलं.भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'शिवसेनेनं सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याचं आयोजन करून हिंदुत्वाबद्दलचे धडे दिले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका शब्दानंही सावरकरांची प्रशंसा का केली नाही, हा प्रश्न आहे. बहुधा ते आपल्या नव्या मित्रांना घाबरत असावेत. त्यांचे नवे मित्र सावरकरांबद्दल वारंवार अपमानास्पद विधानं करतात,' असं कदम म्हणाले.हाच काळाचा न्याय- केशव उपाध्ये
अनेक वर्षे हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा करणारे उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच. पण ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेळी अवाक्षरही न काढणाऱ्या ठाकरेंना आज सावरकर स्मारकात यावे लागले हाच काळाचा न्याय आहे, असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी लगावला. 

Web Title: veer savarkar row shivsena hit back to bjp sanjay raut ask why didnt they give him bharat ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.