Bhagwat Karad: 'मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता, पंकजा मुंडे आमच्या नेत्या, मी केवळ प्रतीकात्मक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 14:09 IST2021-07-13T13:23:45+5:302021-07-13T14:09:03+5:30
bhagwat karad on pankaja munde: मंत्रिपद मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्याला दिले आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

Bhagwat Karad: 'मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता, पंकजा मुंडे आमच्या नेत्या, मी केवळ प्रतीकात्मक'
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देण्यास सुरुवात केली. या नाराज पदाधिकाऱ्यांशी पंकजा मुंडेनी मुंबईत चर्चा केली, त्यांची समजुत काढली. दरम्यान, नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे. एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंकजा मुंडे यांच्याशी भेट झाल्याचे सांगितले आहे.
मुलाखतीदरम्यान कराड म्हणाले की, 'पंकजा मुंडे दिल्लीत आल्याचे समजल्यानंतर मी त्यांना भेटलो. माझी नाराजी नाही पण ज्या तऱ्हेने परिस्थिती बदलली, त्याबद्दल थोडे वेगळे वाटल्याचे त्या म्हणाल्या. मला जो फोन आला होता तो केंद्रीय कार्यालयातून आला होता. मी कोअर कमिटीला सुद्धा सांगितले नव्हते. माझ्या मताने तरी पंकजा मुंडेंच्या मनात कसलीही नाराज नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.
'मी केवळ प्रतीकात्कम'
राजकारणात आलो तेव्हापासून गोपीनाथ मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. पंकजा मुंडे आणि आम्ही सगळे एका कुटुंबासारखे आहोत. राजकारणाचे बाळकडू गोपीनाथ मुंडेंनी दिले आहे. राजकारणातल्या त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात मी राहिलो आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, मीसुद्धा मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत, मी केवळ ''प्रतीकात्मक'' आहे. मंत्रिपद मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्याला दिले आहे हे लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.
आज @Pankajamunde ताई दिल्ली मध्ये बैठकीसाठी आल्या त्यांची भेट घेतली...मन मोकळे झाले..मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली..मी मंत्री झालो मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत..त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या..
— Dr Bhagwat Karad (@DrBhagwatKarad) July 12, 2021
भागवत कराड यांनी काल पंकजा मुंडेंशी भेट झाल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. त्यात त्यांनी म्हटले, 'पंकजाताई दिल्लीत बैठकीसाठी आल्या, त्यांची भेट घेतली. मन मोकळे झाले. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या', असे कराड यांनी ट्वीटमध्ये म्हटले.