कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, शिवकुमार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 06:50 AM2021-03-29T06:50:31+5:302021-03-29T06:51:19+5:30

कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जरकिहोली अडकलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्कँडलसाठी जबाबदार धरल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण बंद करण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत; परंतु कायदा आपले काम करील.

Shivkumar alleges attempt to suppress sex scandal in Karnataka | कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, शिवकुमार यांचा आरोप

कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, शिवकुमार यांचा आरोप

googlenewsNext

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जरकिहोली अडकलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्कँडलसाठी जबाबदार धरल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण बंद करण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत; परंतु कायदा आपले काम करील.
शिवकुमार यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण बंद करण्यासाठी ते लोकांना समोर आणून निवेदन करण्यास भाग पाडत आहेत. सरकारने काहीही केले तरी मी पोलिसांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की, त्यांनी या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे करावी व त्यांच्या आत्मसन्मानाचे रक्षण करावे.
या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करीत असून, पीडितेच्या आई-वडिलांनी दिलेल्या निवेदनाच्या संदर्भात ते म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर पीडितेने माध्यमांसमोरही निवेदन केले. याचा तपास झाला पाहिजे. 
शनिवारच्या घटनाक्रमानंतर पीडितेने एसआयटीसमोर येऊन निवेदन द्यावे, असे आपणास वाटते काय, यावर ते म्हणाले की, मला या विषयावर काहीही म्हणायचे नाही. मी राज्यातील पोटनिवडणुकांवर लक्ष केंद्रित करीत आहे. प्रदेशाध्यक्षांनी मानहानीचा खटला दाखल करण्याच्या शक्यतेचाही त्यांनी इन्कार केला. 
या प्रकरणाला शनिवारी अचानक वेगळे वळण मिळाले. त्या दिवशी पीडितेच्या माता-पित्यांनी आरोप केला की, त्यांच्या मुलीचा वापर करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे घाणेरडे राजकारण करीत आहेत. आमच्या कुटुंबाचे काही बरे-वाईट झाले तर त्याला शिवकुमार जबाबदार असतील, असेही ते म्हणाले होते. त्यांची मुलगी एखाद्या अज्ञात स्थळी असून, काँग्रेस नेत्याने तिला परत पाठवावे, अशी विनंतीही तिच्या आई-वडिलांसह भावाने केली होती. त्यामुळे खळबळ उडाली.
पीडितेच्या कुटुंबीयांनी हे निवेदन दिल्यानंतर जरकिहोली यांनी शिवकुमार यांच्यावर टीका केली. शिवकुमार यांच्याविरुद्ध राजकीय व कायदेशीर लढाई लढण्याचीही त्यांनी घोषणा केली. 
शिवकुमार हे रविवारी जेव्हा बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जरकिहोली यांच्या मूळ जिल्ह्यात बेळगाव येथे दाखल झाले तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्याचवेळी माजी मंत्री व गोकाक येथील भाजपचे आमदार गोकाक यांच्या समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले व परत जा, परत जा, अशी नारेबाजी केली. 
दरम्यान, पीडितेचे वकील जगदीश यांनी सांगितले की, आपला जबाब नोंदविण्यासाठी ती सोमवारी न्यायालयात हजर होऊ शकते. 

जबाब नोंदविण्याची भीती वाटते -पीडिता 
शनिवारच्या घटनाक्रमानंतर पीडितेने एक व्हिडिओ जारी करून म्हटले होते की, तिचे आई-वडील कोणाच्या तरी दबावाखाली येऊन बोलत आहेत. हे सर्व पाहून मला एसआयटीसमोर हजर होऊन जबाब देण्याची भीती वाटते. मला न्यायाधीशांसमोर उभे राहून जबाब नोंदविण्यासाठी मदत करावी, असेही तिने म्हटले होते.  

पीडितेच्या आई-वडिलांना सुरक्षा
राज्याचे गृहमंत्री बसावराज बोम्मई यांनी म्हटले आहे की, व्हिडिओ, ऑडिओ व सीडीची शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासणी करून एसआयटी सत्य बाहेर आणील. पीडितेला संरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, पाच नोटिसा दिल्या आहेत तसेच तिच्या आई-वडिलांनाही सुरक्षा दिली आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Shivkumar alleges attempt to suppress sex scandal in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.