काँग्रेस राजवटीत पेट्रोल-डिझेलसाठी आंदोलन करणारी भाजपा आता मूग गिळून गप्प; शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 07:39 AM2021-10-19T07:39:15+5:302021-10-19T07:46:40+5:30

गेल्या तीन आठवडय़ांमध्ये तर तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. लागोपाठ होणाऱ्या या दरवाढींमुळे देशभरातील जनमानस अस्वस्थ आहे.

Shiv sena Target BJP Over Petrol Diesel Price hike in country | काँग्रेस राजवटीत पेट्रोल-डिझेलसाठी आंदोलन करणारी भाजपा आता मूग गिळून गप्प; शिवसेनेचा टोला

काँग्रेस राजवटीत पेट्रोल-डिझेलसाठी आंदोलन करणारी भाजपा आता मूग गिळून गप्प; शिवसेनेचा टोला

Next
ठळक मुद्देविमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इंधन महाग झालेपेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरुद्ध कोणी एक शब्दही बोलायला तयार नाही. कठीण परिस्थितीतही इंधनाचे दर आटोक्यात ठेवणाऱ्या मनमोहन सिंगांवर वाटेल तशी चिखलफेक करणारी मंडळी आज सत्तेत आहे.

मुंबई - राजस्थानातील श्रीगंगानगर या सीमावर्ती शहरात पेट्रोल-डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत. तिथे एक लिटर पेट्रोलसाठी सुमारे 118 तर डिझेलसाठी 106 रुपये मोजावे लागतात. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई या महानगरांत आणि एकूणच देशाच्या कानाकोपऱयात थोड्याफार फरकाने पेट्रोल-डिझेलचे दर जवळपास असेच आहेत. काँग्रेसच्या(Congress) राजवटीत पेट्रोल-डिझेलच्या दरांनी साठी ओलांडल्यानंतर देशभर आंदोलनांचे काहूर माजवून बेंबीच्या देठापासून कोकलणारी मंडळी आज सत्तेत आहेत, पण त्यांची तोंडे आता शिवलेली आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची(BJP) नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने(Shivsena) टीकास्त्र सोडलं आहे.

तसेच केंद्रीय सरकारला लागलेली अवाढव्य करांची चटक आणि तिजोरी भरण्याच्या हव्यासातच पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मूळ दडले आहे. आता तर विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकींचे इंधन महाग झाले. इंधनाची ही ‘हवा-हवाई’ दरवाढ सामान्य जनतेची कंबर मोडणारी आहे. ‘बहोत हो गयी महंगाई की मार…’ अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने केलेला हा चमत्कार आहे. आपणच ओढवून घेतलेला हा ‘मार’ मुकाटय़ाने सहन करण्याशिवाय जनतेच्या हाती तरी दुसरे काय उरले आहे? असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

पेट्रोल-डिझेलची(Petrol-Diesel Price Hike) दररोज होणारी दरवाढ आणि त्यामुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे आता असह्य करून सोडले आहे. हा हा म्हणता पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरीचा आकडा ओलांडला आणि इंधनाच्या सलग होणाऱ्या दरवाढीमुळे साहजिकच मालवाहतुकीचा खर्च वाढून सर्वच क्षेत्रांत महागाईने आपले हातपाय पसरले.

गेल्या तीन आठवडय़ांमध्ये तर तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. लागोपाठ होणाऱ्या या दरवाढींमुळे देशभरातील जनमानस अस्वस्थ आहे. मागच्या आठवडय़ात रविवारपर्यंत तर सलग चार दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली आणि इंधनाच्या दरांनी भलताच उच्चांक गाठला.

विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इंधन महाग झाले. एव्हीएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) म्हणजेच विमान प्रवासासाठी लागणाऱया हवाई इंधनाच्या दरांना मागे टाकून बाईक व कारच्या इंधन दरांनी नवीन विक्रम नोंदविला आहे. हवाई वाहतुकीच्या इंधनाचा दर एका लिटरला 79 रुपये आहे आणि रस्ता वाहतुकीच्या वाहनांचा इंधन दर 105 ते 115 रुपयांहून अधिक झाला आहे.

दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी लागणाऱया पेट्रोल-डिझेलचे दर हवाई इंधनापेक्षा थोडेथोडके नव्हे, तर तीस टक्क्यांनी महाग झाले आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरुद्ध कोणी एक शब्दही बोलायला तयार नाही. ‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं चाहीए?’ असे सवाल निवडणुकींच्या प्रचार सभांतून उपस्थित करत भाजपने दिल्लीची सत्ता मिळवली, तेव्हा देशात पेट्रोल 72 रुपये तर डिझेल 54 रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात होते.

आज पेट्रोल-डिझेल शंभरी ओलांडून पुढे गेले, विमानाच्या इंधनापेक्षाही महाग झाले. देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे, पण तेव्हाचे तमाम आंदोलनकर्ते आता कुठल्या बिळात लपून बसले आहेत हे कळण्यास मार्ग नाही. यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रतिबॅरल म्हणजे सध्याच्या दरांपेक्षा दुपटीने महाग होते, तरी पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीकडे कधीच सरकले नाहीत.

कठीण परिस्थितीतही इंधनाचे दर आटोक्यात ठेवणाऱ्या मनमोहन सिंगांवर वाटेल तशी चिखलफेक करणारी मंडळी आज सत्तेत आहे. यूपीए राजवटीच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर विद्यमान राज्यकर्त्यांच्या काळात जवळपास निम्म्यावर आले. तरीही पेट्रोल-डिझेलच्या इंधनाचे दर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस का वाढत आहेत, या प्रश्नाचे नेमके उत्तर केंद्रीय सरकारचे प्रवक्ते कधीच देत नाहीत.

Web Title: Shiv sena Target BJP Over Petrol Diesel Price hike in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app