Serious allegations against the party's city president by a woman NCP office bearer in Ambernath | राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याकडून पक्षाच्या शहराध्यक्षांवर गंभीर आरोप

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याकडून पक्षाच्या शहराध्यक्षांवर गंभीर आरोप

अंबरनाथ - राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला पदाधिकाऱ्याने आपल्याच पक्षाच्या शहराध्यक्षांवर गंभीर आरोप केला आहे. एका पोलिसावर दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप या महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. (Ambernath) ही घटना अंबरनाथ शहरामधील आहे. (Serious allegations against the party's city president by a woman NCP office bearer in Ambernath)

राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या शहराध्यक्ष असलेल्या एका तरुणीने एका पोलिसावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सदर तरुणीने प्रमोद हिंदुराव या पोलिसावर आरोप केले होते. मात्र या पोलिसावर अद्याप कारवाई झालेली नाही. दरम्यान, या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असताना राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी गुन्हा दाखल करू नये यासाठी आपल्यावर दबाव आणला. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतरही तक्रार मागे घेण्यासाठी २० लाख रुपये घेऊन देण्याचे आमिष दाखवले, अशा आरोप या तरुणीने केला आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही नाईनने प्रसारित केले आहे.

मात्र सदाशिव पाटील यांनी या महिला पदाधिकाऱ्याने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच गुन्हा मागे घेण्यासाठीही मी कुणावरही दबाव टाकलेला नाही, असेही सदाशिव पाटील यांनी सांगितले. उलट ही तरुणी राष्ट्रवादीची पदाधिकारी असूनही भाजपाच्या मंचावर होती, असा प्रत्यारोप पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, या तरुणीने या प्रकरणी थेट जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच परवा सुप्रिया सुळे ह्या अंबरनाथमध्ये आल्या असताना त्यांच्याकडेही आपले म्हणणे मांडले. मात्र यादरम्यान, या तरुणीची पदावरून हकालपट्टी करून तिच्या जागी दुसऱ्या एका तरुणीची नियुक्ती करण्यात आली आहे. आता आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे, असा आरोप या तरुणीने केला आहे.

Web Title: Serious allegations against the party's city president by a woman NCP office bearer in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.