राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 09:43 AM2020-09-13T09:43:15+5:302020-09-13T09:46:34+5:30

कंगना प्रकरणावरुन मुंबई आणि महाराष्ट्राची देशात बदनामी होत असताना राज ठाकरेंचं मौन हे आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणासाठी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Sanjay Raut worried about Raj Thackeray future; There will be differences with Shiv Sena | राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...

राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...

Next
ठळक मुद्देठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहेराज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार

मुंबई – सध्या महाराष्ट्रात कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरु आहे. कंगनानं मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या विधानानं याची सुरुवात झाली. कंगनाला मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर तिने मुंबईत राहू नये असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, मात्र त्यावरुन संजय राऊतांनी मला मुंबई येऊ नये अशी धमकी दिल्याचा आरोप कंगना राणौतने केला.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष सुरु आहे. मी मुंबई येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर अडवून दाखवाव असं थेट चॅलेंज कंगनानं शिवसेनेला दिलं. त्यावर मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे असं उत्तर शिवसेनेने दिलं. कंगनाच्या बेकायदेशीर कार्यालयावर हातोडा मारणे असेल किंवा कंगनानं मुंबईबद्दल केलेले विधान असेल या सर्व घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मौन बाळगलं. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक भाष्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं मत त्यांनी मांडले आहे.

एरव्ही पोलिसांबद्दल नेहमी भरभरून बोलणारे राज ठाकरे कंगना प्रकरणात शांत का झालेत असा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जातो. कंगना प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकर यांनी मुंबई पोलिसांबद्दल काहीही बोललेलं सहन करणार नाही असा इशारा कंगनाला दिला होता. पण त्याचसोबत कोणत्या गोष्टीला किती महत्व दिलं पाहिजे हे आम्हाला राजसाहेबांनी शिकवलं आहे असं सांगत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला होता. कंगना प्रकरणावरुन मुंबई आणि महाराष्ट्राची देशात बदनामी होत असताना राज ठाकरेंचं मौन हे आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणासाठी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईसा पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांघकामावर उल्लेख करताच महानगरपालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणाऱ्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवच म्हटले पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे.

आज मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचा एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक त्यांच्यामागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे, असा हा कठीण काळ आलाच आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला डिवचले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला. यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदी यांनीच सांगावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे.

कंगना प्रकरणात शिवसेना बॅकफूटवर

दादर, परळमधील शिवसैनिकांच्या मनात सध्या हीच भावना आहे की अर्णब गोस्वामीनी बाळासाहेबांच्या काळात ही अशी आगपाखड केली असती तर काय झालं असतं? खळ्ळखट्याकचे दिवस गेले आता ! रणकंदन ही शिवसेनेची रणनीती होती. ती आज नाही. कंगना रणौतबद्दल शिवसेनेनं जी रणनीती आखली ती पार फसली. ‘मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर मला हात लावून दाखवा’, अशी धमकी तिनं दिली होती. ती तशी आलीही. कंगना मुंबईत उतरण्याच्या काही मिनिटं आधी तिच्या कार्यालयाचं अवैध बांधकाम पाडून तिच्या येण्यावरील मीडियाचा फोकस शिवसेनेनं हटवला; पण बुलडोझर चालविल्याच्या घटनेनं कंगनाला विनाकारण सहानुभूतीही मिळाली. तिचं थोबाड फोडू म्हणणारे तिला धक्का लावू शकले नाहीत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही असं म्हणणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नंतर मौनाची गोळी खाल्ली. वितंडवादासाठी विख्यात असलेल्या संजय राऊतांनाही ‘कंगनाचा विषय आता संपला’ असं जाहीर करावं लागलं. कंगना प्रकरणात शिवसेना बॅकफूटवर गेली.

Web Title: Sanjay Raut worried about Raj Thackeray future; There will be differences with Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.