Rajasthan govt will complete its full term of 5 years and we will win the next elections as well said Rajasthan CM Ashok Gehlot | सचिन पायलट यांच्या घरवापसीवर अशोक गहलोतांनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले...

सचिन पायलट यांच्या घरवापसीवर अशोक गहलोतांनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले...

नवी दिल्ली/ जयपूर: राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यास चार दिवस शिल्लक असताना, माजी उपमुख्यमंत्री व गहलोत सरकारविरुद्ध उभे ठाकलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंड मागे घेतले असून, त्यांची वापसीची तयारी सुरू झाली आहे. पायलट यांनी सोमवारी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर दोन्ही गटांत समझोत्याच्या दृष्टीने पावले पडू लागली.

गेल्या महिन्यात राजस्थानचेअशोक गहलोत यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवून उपमुख्यमंत्रिपद तसंच राजस्थान प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद गमावणारे सचिन पायलट यांना एकाकी पडल्यामुळं नमतं घ्यावं लागलं. सर्व समर्थक बंडखोर आमदार पायलट यांना सोडून गेल्यामुळे 'घरवापसी'शिवाय पर्याय नसलेल्या पायलट यांनी राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी-वाड्रा यांची भेट घेतली. सचिन पायलट यांची बंडखोरी मोडीत निघाल्यामुळे राजस्थानात गहलोत सरकारवर समोरचं राजकीय संकटही आता संपल्यात जमा आहे. 

सचिन पायलट यांनी घरवापसी केल्यानंतर अशोक गहलोत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर अखेर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राजस्थानमध्ये जे घडले तो आता इतिहास झाला असं सांगितले. तसेच पक्षात परत आलेल्यांच्या अडचणी दूर करु, असं अशोक गहलोत यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे सीबीआय, ईडीचा गैरवापर करण्यात येत आहे. धर्माच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. मात्र असं असलं तरी आमचं सरकार ५ वर्ष पूर्ण करेल आणि आम्ही पुढील निवडणूक देखील जिंकू, असा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे. 

सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर अशोत गहलोतांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. चांगली इंग्रजी बोलणे, माध्यमांना चांगले बाइट देणे आणि सुंदर, देखणे दिसणे या सर्व गोष्टी काही उपयोगाच्या नाही. देशाबद्दल आपल्या मनात काय आहे, आपली विचारधारा, धोरणं आणि वचनबद्धता काय आहे, कशी आहे, या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात, अशी टीका अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर केली होती.

सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानुसारच-

या संपूर्ण चर्चेत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी सहभागी नव्हत्या. मात्र त्यांच्या सल्ल्यानेच राहुल आणि प्रियांका गांधी यांनी हे निर्णय घेतले. ते घेताना त्या दोघांनी काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांच्यामार्फत अशोक गेहलोत यांनाही विचारात घेतले. सोनिया गांधी घेतील तो निर्णय आपण मान्य करू, असे गेहलोत यांनी सांगितल्याने तिढा बऱ्याच प्रमाणात सुटू शकला.

प्रत्यक्ष समझोत्यासाठी एक समिती-

अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात प्रत्यक्ष समझोता घडवून आणण्यात येणार असून, त्यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे. त्यातील नेते या दोघांशी स्वतंत्रपणे व दोघांना एकत्र घेऊन चर्चा करणार आहेत. सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर अन्याय होऊ नये, त्यांना पक्षात मान दिला जावा आणि यापुढे त्यांच्यावर पक्षद्रोही असा शिक्का मारला जाऊ नये, यासाठी दोघा नेत्यांत समझोता घडवून आणणे, ही या समितीची जबाबदारी असेल. एक तास चाललेल्या चर्चेअंती सचिन पायलट काँग्रेसमधून बाहेर पडणार नाहीत आणि अधिवेशनाला हजर राहून अशोक गेहलोत सरकारला पाठिंबा देतील, हे स्पष्ट झाले.

Web Title: Rajasthan govt will complete its full term of 5 years and we will win the next elections as well said Rajasthan CM Ashok Gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.