राज्यातील भाजपा-मनसे युतीबाबत केंद्रीय नेतृत्वाची भूमिका आली समोर, युतीबाबत दिले असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 11:12 AM2021-08-10T11:12:44+5:302021-08-10T11:16:53+5:30

BJP-MNS alliance Update: काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे भाजपा आणि मनसे युती नक्की झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता या युतीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका समोर आली आहे.

The opinion expressed by the central leadership of BJP about the BJP-MNS alliance in Maharashtra, hints given about the alliance | राज्यातील भाजपा-मनसे युतीबाबत केंद्रीय नेतृत्वाची भूमिका आली समोर, युतीबाबत दिले असे संकेत

राज्यातील भाजपा-मनसे युतीबाबत केंद्रीय नेतृत्वाची भूमिका आली समोर, युतीबाबत दिले असे संकेत

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपाच्या राज्यातील आणि केंद्रीय नेत्यांच्या बैठकीमध्ये भाजपा मनसे युतीबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती समोर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने बाळगले मौनभाजपा आणि मनसेच्या संभाव्य युतीला भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सध्यातरी रेड सिग्नल मिळाला असल्याचे संकेत

नवी दिल्ली - राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मोठा पक्ष बनूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. एकीकडे अनेक मतभेद असूनही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची राज्यातील सत्ता दिवसागणित अधिकाधिक भक्कम होत असल्याने राज्यातील भाजपाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी मजबूत झाल्याने राज्यातील भाजपाच्या नेत्यांनीही युतीसाठी नव्या मित्रांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, पुढच्या काळाता महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. (BJP-MNS alliance) काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे भाजपा आणि मनसे युती नक्की झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता या युतीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका समोर आली आहे. (The opinion expressed by the central leadership of BJP about the BJP-MNS alliance in Maharashtra)

दिल्लीत काल झालेल्या भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रीय नेत्यांच्या बैठकीमध्ये भाजपा मनसे युतीबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. टीव्ही-९ मराठीने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या बैठकीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मौन बाळगले आहे.  त्यामुळे राज्यातील भाजपा आणि मनसेच्या संभाव्य युतीला भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सध्यातरी रेड सिग्नल मिळाला असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याबरोबरच भाजपा आणि मनसे युती ही केंद्रीय नेतृत्वाला मान्य नसल्याचे तसेच ही भेट टाळता आली असती, अशीही भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका असल्याचे समोर येत आहे. 

तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचीही दिल्लीमध्ये भेट होऊ शकली नाही. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि बी. एल. संतोष यांची भेट घेतली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांची भेट घेतली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील भाजपाचे नेते केंद्रात तळ ठोकून असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसे युतीचे बिगुल वाजेल अशी शक्यता वर्तवली जात होती. 

Web Title: The opinion expressed by the central leadership of BJP about the BJP-MNS alliance in Maharashtra, hints given about the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.