'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, भाजपाकडून शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 15:39 IST2021-03-04T15:31:05+5:302021-03-04T15:39:42+5:30
Kerala Assembly Elections 2021: ई. श्रीधरन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक मानले जातात.

'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, भाजपाकडून शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (भाजपा) आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची गुरुवारी घोषणा केली आहे. 'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन यांची केरळच्यामुख्यमंत्री पदाचे उमेदावर म्हणून भाजपाने नियुक्ती केली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी ई. श्रीधरन यांनी भाजपात प्रवेश केला होता. केरळमधील भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून येथील प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी ई. श्रीधरन यांच्या नावाची घोषणा केली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केरळमध्ये सर्व १४ जिल्ह्यांतील १४० विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तर २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे केरळमध्ये आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
'Metro Man' E Sreedharan (in file photo) will be BJP's Chief Minister candidate in the upcoming #KeralaAssemblyElections2021: State BJP chief K Surendran pic.twitter.com/EgQVQ5RSQi
— ANI (@ANI) March 4, 2021
ई. श्रीधरन यांच्याविषयी...
८८ वर्षांचे ई. श्रीधरन हे भारताचे प्रसिद्ध सिव्हिल इंजीनिअर आहेत. १९९५ ते २०१२ या काळात ते दिल्ली मेट्रोचे संचालक होते. दिल्ली मेट्रोची योजना यशस्वीपणे अंमलात आणण्यामागे ई. श्रीधरन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दिल्ली मेट्रोशिवाय कोलकाता मेट्रो, कोचीन मेट्रो आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांतही ई. श्रीधरन यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळेच त्यांना 'मेट्रोमॅन' म्हणून ओळखले जाते. तसेच, भारत सरकारने २००१ मध्ये त्यांचा पद्मश्री आणि २००८ मध्ये पद्मविभूषणने पुरस्काराने गौरव केला आहे.
मोदींचे समर्थक मानले जातात
ई. श्रीधरन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक मानले जातात. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन वेळा त्यांनी नरेंद्र मोदींना एक चांगला नेता म्हणून संबोधले होते. पंतप्रधानपदाच्या मोदींच्या दाव्याचे समर्थन करणाऱ्यांमध्येही ई. श्रीधरन यांचे नाव होते.