Marathi artists campaign for MNS in Pune graduate elections; Challenge to BJP & NCP | पुणे पदवीधर निवडणुकीत मनसेसाठी मराठी कलाकार सरसावले; अनेक संघटनांचाही पाठिंबा

पुणे पदवीधर निवडणुकीत मनसेसाठी मराठी कलाकार सरसावले; अनेक संघटनांचाही पाठिंबा

ठळक मुद्देमागील निवडणुकीत फारच थोड्या फरकाने भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला होताविधान परिषदेच्या या निवडणुकीवर महाविकास आघाडी आणि भाजपाचं भवितव्य अवलंबून असणार आहे पुणे पदवीधर निवडणुकीत यंदा मनसेने पहिल्यांदा उमेदवार उभा केला आहे त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते

मुंबई – राज्यात येत्या १ डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक होणार आहे, या निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे, या ५ जागांपैकी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं प्रत्येकी २ तर शिवसेनेने एका जागेवर उमेदवार उभा केला आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीवर महाविकास आघाडी आणि भाजपाचं भवितव्य अवलंबून असणार आहे, त्यामुळे दोन्हीबाजूने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीत यंदा मनसेने पहिल्यांदा उमेदवार उभा केला आहे त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते, पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाने सांगलीचे संग्राम देशमुख, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने सांगलीतील अरूण लाड यांना उमेदवारी दिली आहे. पूर्वापार हा मतदारसंघ भाजपाने आपल्या ताब्यात ठेवला आहे. परंतु मागील निवडणुकीत फारच थोड्या फरकाने चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला होता, त्यावेळी राष्ट्रवादीचे अरूण लाड यांनी बंडखोरी केल्याने त्याचा फटका पक्षाच्या सारंग पाटील यांना बसला होता, मात्र यंदा अरूण लाड उमेदवार असल्याने ही निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली आहे.

मात्र पुणे पदवीधर निवडणुकीत मनसेनेही रंग भरले आहेत, पुणे पदवीधर निवडणुकीत व्यवसायाने वकील असलेल्या पक्षाच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेने या निवडणुकीत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे, पुणे पदवीधरच्या ५ जिल्ह्यात मनसेकडून प्रचार मेळावे, बैठका घेण्यात येत आहेत. त्याचसोबत मनसेच्या प्रचारासाठी मराठीतील दिग्गज कलाकारही सरसावले आहेत, अभिनेता भरत जाधव, संजय नार्वेकर, सुनील बर्वे, अभिनेत्री स्मिता तांबे, सायली संजीव, मेघा पवार यांनी व्हिडीओच्या माध्यमातून पदवीधरांना मनसे उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केले आहे, तर भारतीय मराठा महासंघ, राष्ट्रीय छावा संघटना आणि विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत मनसेनं भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यासमोर तगडं आवाहन निर्माण केल्याचं दिसून येत आहे.

अलीकडेच मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे, जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस अशी धमकी दिल्याने पुण्यात खळबळ माजली होती. याबाबत रुपाली पाटील यांच्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे, मात्र अशा धमक्यांना भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राज ठाकरेंनी रुपाली पाटील यांना फोन करून तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो असं सांगत त्यांना बळ दिलं आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख म्हणाले, या निवडणुकीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला देखील मतदानाच्या दिवशी शेवटच्या एक तासात मतदानाच हक्क बजावता येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या धर्तीवर मतदान केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे. त्यातच यंदाच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत, भाजपा आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचे उमेदवार सांगलीचे आहेत आणि रुपाली पाटील पुण्याच्या आहेत, त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात मनसेमुळे रंगतदार लढाई पाहायला मिळत आहे, यात रुपाली पाटील ठोंबरे जायंट किलर ठरणार का? हे निकालात दिसून येईल.

Web Title: Marathi artists campaign for MNS in Pune graduate elections; Challenge to BJP & NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.