"महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस' आता अधिक गतिमान होणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 08:35 PM2020-12-04T20:35:56+5:302020-12-04T20:46:38+5:30

Ashok Chavan And Maharashtra Legislative Council polls : "निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत एकूण २४ जिल्ह्यांत थेट जनतेतून मतदान झाले व सर्वच्या सर्व पाचही मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली."

Maha Vikas Aghadi Maharashtra Express' to be faster now says Ashok Chavan | "महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस' आता अधिक गतिमान होणार"

"महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस' आता अधिक गतिमान होणार"

Next

मुंबई -  विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे आणि आत्मविश्वास दुणावणारे असून, या निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्सप्रेस अधिक गतिमान होणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. आजच्या निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्यातील सरकारच्या स्थापनेनंतर थेट जनतेतून होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल देऊन राज्य सरकारवर आपला विश्वास व्यक्त केला तर भाजपचा सपशेल पराभव केला. 

"निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत एकूण २४ जिल्ह्यांत थेट जनतेतून मतदान झाले व सर्वच्या सर्व पाचही मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली. कोल्हापूर व गोंदिया या शहरांना जोडणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसप्रमाणे आता महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस' देखील सुसाट होईल. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळेच मागील अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ले म्हणून ओळखले जाणारे नागपूर व पुणे पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीने जिंकले."

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीला दुप्पट मते मिळाली, तर पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडी समोर आहे. या निकालांनी राज्य सरकारचे हात अधिक बळकट झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेला सणसणीत टोला लगावला आहे. "ठीक आहे आम्ही कमी पडलो! पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा... मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा.. बाकी मैदानात परत भेटूच !!" असं ट्विट नितेश यांनी केलं आहे. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. "तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. "विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजपा नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची 'पॉवर' किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं" असं देखील फडणवीस म्हणाले. 

Web Title: Maha Vikas Aghadi Maharashtra Express' to be faster now says Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.