Raj Thackeray: ...अन् अजित डोवालांवर केलेला 'स्ट्राईक' राज ठाकरेंवरच उलटला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 16:10 IST2019-04-27T16:09:34+5:302019-04-27T16:10:46+5:30
राज ठाकरेंनी पुलवामा हल्ल्याच्या संशयाची सुई अजित डोवाल यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता.

Raj Thackeray: ...अन् अजित डोवालांवर केलेला 'स्ट्राईक' राज ठाकरेंवरच उलटला!
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने गंभीर आरोप केलेत. हा हल्ला घडवून तर आणला नाही ना, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापुरातील सभेत पहिल्यांदा त्यांनी ही शंका घेतली होती आणि थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे संशयाची सुई वळवण्याचा प्रयत्न केला होता. पुलवामामधील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत, अजित डोवाल या माणसाची चौकशी केल्यास सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली होती. परंतु, भाजपाने आज राज यांचीच सुई त्यांनाच टोचल्याचं पाहायला मिळालं.
'२७ डिसेंबरला अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची थायलंडमध्ये भेट झाली होती. या बैठकीत काय झालं हे आम्ही विचारायला नको का? या भेटीनंतर एक-दीड महिन्यातच देशात युद्धसदृश परिस्थिती कशी निर्माण झाली? या भेटीत काय झालं, काय घडलं, बोलणी यशस्वी झाली की फिस्कटली?', असे प्रश्न करत राज ठाकरेंनी डोवाल यांना जवळपास आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं करण्याचा प्रयत्न केला होता. एका वेबसाईटची बातमी स्क्रीनवर दाखवत त्यांनी हा 'स्ट्राईक' केला होता. पण तो त्यांच्यावरच उलटला. कारण, ही भेट २०१८च्या नव्हे, तर २०१७च्या डिसेंबर महिन्यात २७ तारखेला झाली होती. राज यांनी जी बातमी स्क्रीनवर दाखवली, त्या बातमीची खरी तारीख दाखवत आज भाजपाने राज यांना खोटं पाडलं.
अजित डोवाल आणि नासेर खान जंजुआ यांच्यातील चर्चेचा मुख्य विषय नियंत्रण रेषेवरील घुसखोरी हा होता. तसंच, हेरगिरीच्या संशयावरून पाकिस्ताननं ताब्यात घेतलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासंबंधीही या बैठकीत चर्चा झाली होती, याकडे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी लक्ष वेधलं. या भेटीनंतर तब्बल १४ महिन्यांनी पुलवामा इथे दुर्दैवी हल्ला झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
सुषमा स्वराजांची बातमी अन् व्हिडीओ
बालाकोट इथल्या एअर स्ट्राईकसंदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या एका विधानावरून राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या एकाही नागरिकाचा किंवा सैनिकाचा मृत्यू झाला नसल्याचं स्वराज म्हणाल्या होत्या. त्या संदर्भातील बातमीचं कात्रण दाखवत, स्ट्राईकमध्ये कुणीही मेलेलं नाही, असं केंद्रीय मंत्रीच म्हणत असल्याचं राज म्हणाले होते. त्यावर, भाजपाने आज स्वराज यांच्या संपूर्ण विधानाचा व्हिडीओ दाखवला. दहशतवाद्यांनाच लक्ष्य करण्याचं वायुसेनेनं ठरवलं होतं आणि त्यांनी आपलं काम फत्ते केलं, एकाही पाकिस्तानी नागरिकाचा किंवा सैनिकाचा मृत्यू झालेला नाही, असं त्यांचं वाक्य होतं. ते ऐकवून भाजपाने राज यांनी कोंडी केली.
'या' व्हिडीओवर राज ठाकरेंकडे आहे का उत्तर? @BJP4Maharashtra@mnsadhikrut#RajThackerayhttps://t.co/n7TGGchYso
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2019
'ज्यांनी शिवाजी पार्कातले एक झाड दत्तक घेतले नाही, ते गावाबद्दल बोलतात'https://t.co/HcGfe5mpus@RajThackeray@mnsadhikrut@ShelarAshish@BJP4Maharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2019
'आता बघाच तो व्हिडीओ'मधून राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोलhttps://t.co/IsQAXt4HVZ@RajThackeray@mnsadhikrut@ShelarAshish@BJP4Maharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2019