धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार: गुलाबराव पाटील

By मोरेश्वर येरम | Updated: January 16, 2021 19:12 IST2021-01-16T19:00:02+5:302021-01-16T19:12:28+5:30

"धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंडे यांनी याआधीच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे"

gulabrao patil supports dhananjay munde over allegation on him | धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार: गुलाबराव पाटील

धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार: गुलाबराव पाटील

ठळक मुद्देगुलाबराव पाटील यांनी विरोधकांना सुनावलेधनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचं केलं विधानधनंजय मुंडे प्रकरणावरुन गुलाबराव पाटील यांनी केले विरोधकांवरच आरोप

जळगाव
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपवरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर राष्ट्रवादीसह शिवसेना नेतेही धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. 

"धनंजय मुंडे हे नक्की यातून निर्दोष सुटतील. त्यांचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे", असा थेट आरोप शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते जळगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारलं असता पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 

"धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंडे यांनी याआधीच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी आपल्या अपत्यांबाबतही माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपात काही तथ्य असेल असं वाटत नाही. ते नक्कीच यातून निर्दोष सुटतील", असं गुलाबराव पाटील म्हणाले. 

एका आठवड्यात तपास पूर्ण होणार
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची आठवड्याभरात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर माजी आमदार कृष्णा हेगडे, मनसेचे नेते मनिष धुरी यांनीही तक्रारदार महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं झालं आहे. त्यात राज्याच्या मंत्र्यावर आरोप केलेले असल्यानं त्याचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्यासाठी राष्ट्रवादीकडून पावलं उचललं जात आहेत. 

शरद पवार काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ते म्हणाले की, आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा केली. त्याचबरोबर त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगचे आरोप आहेत. वेगळ्या विचारांचे आणि वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबाबत बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावे असे आपण सुचविले आहे. चौकशी पूर्ण झाल्यावरच पुढचा निर्णय घेऊ. 
 

Web Title: gulabrao patil supports dhananjay munde over allegation on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.