“एकनाथ खडसे आमचे नेते होते, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”; भाजपानं दिला निरोप

By प्रविण मरगळे | Published: October 21, 2020 02:00 PM2020-10-21T14:00:27+5:302020-10-21T15:13:32+5:30

Eknath Khadse will Join NCP News: आम्हाला शेवटपर्यंत आशा होती एकनाथ खडसे पक्षात राहतील पण त्यांचा निर्णय झाला असावा. संघटनेने एकनाथ खडसेंसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व केले. खडसेंना डावलून कोणताही निर्णय घेतला नाही असं भाजपानं स्पष्ट केलं.

"Eknath Khadse was our leader, I wish him all the best for the future" - BJP | “एकनाथ खडसे आमचे नेते होते, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”; भाजपानं दिला निरोप

“एकनाथ खडसे आमचे नेते होते, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”; भाजपानं दिला निरोप

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष सातत्याने एकनाथ खडसेंच्या संपर्कात होते, संघटनेला कोणताही त्रास होणार नाही असा निर्णय होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेलेएकनाथ खडसेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे खडसेंच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खडसेंना डावलून कोणताही निर्णय घेतला नाही असं भाजपानं स्पष्ट केलं.

मुंबई – भाजपा नेते एकनाथ खडसेंनी राजीनामा पाठवला आहे. चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला, शेवटपर्यंत एकनाथ खडसेभाजपातच राहावे यासाठी प्रयत्न केले, पण त्यांचा निर्णय ठरला होता, त्यामुळे खडसेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, कोणताही नेता अथवा कार्यकर्ता पक्षातून बाहेर पडतो त्याचा आनंद निश्चित नसतो. एकनाथ खडसेंवर अन्याय झाला की नाही हा व्यक्तिसाक्षेप निर्णय असू शकतो, प्रदेशाध्यक्ष सातत्याने एकनाथ खडसेंच्या संपर्कात होते, संघटनेला कोणताही त्रास होणार नाही असा निर्णय होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु एकनाथ खडसेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे खडसेंच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. आम्हाला शेवटपर्यंत आशा होती एकनाथ खडसे पक्षात राहतील पण त्यांचा निर्णय झाला असावा. संघटनेने एकनाथ खडसेंसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व केले. खडसेंना डावलून कोणताही निर्णय घेतला नाही असं भाजपानं स्पष्ट केलं.

शरद पवारांच्या उपस्थितीत खडसे बांधणार राष्ट्रवादीचं घड्याळ

एकनाथ खडसेंनी भाजपाचा त्याग केलेला असल्याने शुक्रवारी दुपारी २ वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत आम्ही करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

 महाविकास आघाडीच्या कुटुंबात आल्याचं स्वागत -मुख्यमंत्री

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आनंद आहे. त्यांचे महाविकास आघाडीच्या कुटुंबात स्वागत आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना काय मिळणार?

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, इतकचं नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळात खडसेंचा समावेश करण्यासाठी चर्चा सुरु आहे, यात शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं शरद पवारांनी सांगितल्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

ऑडिओ क्लीप व्हायरल

एकनाथ खडसेंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यापैकीच, एका समर्थकाने थेट खडसेंना फोन करुन राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विचारणा केली. त्यावर, अगोदर तिकडून प्रस्ताव तर येऊ द्या, ते आपल्याला मानाचं स्थान देणार का, याची खात्री करुनच आपण प्रवेश करूया, असे खडसेंनी म्हटले होते. खडसे आणि कार्यकर्त्याची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

Web Title: "Eknath Khadse was our leader, I wish him all the best for the future" - BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.