खडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा

By प्रविण मरगळे | Published: September 23, 2020 03:37 PM2020-09-23T15:37:56+5:302020-09-23T15:46:43+5:30

दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंना डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही. खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार शिवू शकत नाही असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

Eknath Khadse cannot go to the other Political Party Said BJP leader Sudhir Mungantiwar | खडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा

खडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा

Next
ठळक मुद्देखडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार शिवू शकत नाही खडसेंना विधानसभा निवडणुकीवेळीही अनेक ऑफर आल्या पण त्यांनी पक्ष सोडला नाहीआमच्या आधीपासून त्यांनी पक्षासाठी भरपूर काही केलं आहे. त्यांचा त्यागाचा सन्मान आहे.

मुंबई – भाजपाचा उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. खुद्द शरद पवार यांनी याबाबत स्थानिक नेत्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यात जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर काय परिणाम होतील याची माहिती शरद पवारांनी जाणून घेतली. उत्तर महाराष्ट्रातील नेता म्हणजे एकनाथ खडसे यांच्या नावाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र याबाबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नकार दिला आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, माझ्या आयुष्यात राजकारणाची किंवा व्यक्ती समजण्यासाठी थोडी समज असेल तर एकनाथ खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही. खडसेंचे काम विचारासाठी आहे ते व्यक्तीसाठी नाही. खडसेंना विधानसभा निवडणुकीवेळीही अनेक ऑफर आल्या पण त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यांच्या विचाराची श्रद्धा ही अंबुजा सिमेंटच्या दिवारासारखी तुट सकती है पण विचारांची श्रद्धा तुटू शकत नाही. संवादाच्या माध्यमातून सगळे प्रश्न सुटतील. आमच्या आधीपासून त्यांनी पक्षासाठी भरपूर काही केलं आहे. त्यांचा त्यागाचा सन्मान आहे. भाजपा पक्ष नाही तर परिवार आहे, असे विचार मनात आणू नका असं त्यांनी सांगितले. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

त्याचसोबत एकनाथ खडसे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत, जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा, काही घटनांबद्दल दु:ख असू शकतात. पण खडसे भाजपा सोडून इतर पक्षात जाऊच शकत नाही, दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंना डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही. खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार शिवू शकत नाही असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील हा नेता भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. या नेत्याला पक्षात घेतल्यास त्याचा कितपत फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो याची चाचपणी शरद पवार घेत आहेत. यात राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील यांच्यासोबत आढावा घेण्यात येत आहे. भाजपातून या नेत्याला राष्ट्रवादीत घेण्याबाबत स्थानिक नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी शरद पवारांनी बैठक बोलावली.

याबाबत मराठी वृत्तवाहिन्यांनी केलेल्या दाव्यानुसार उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे आक्रमकपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. फडणवीसांनीच माझं तिकीट कापलं, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, आता मी यावर पुस्तक लिहिणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितले होते.

त्यामुळे जर एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतील तर जळगाव जिल्ह्यातील पक्षीय राजकारणात याचा काय परिणाम होऊ शकतो याबाबत शरद पवारांच्या बैठकीत खलबतं होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीही एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र ती केवळ चर्चा होती. त्यांनी भाजपातच राहणे पसंत केले, परंतु एकनाथ खडसेंनी आता पक्षातील विरोधकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं आहे.

खडसे प्रकरणात शिवसेना नेते गुलाबराव पाटील काय म्हणाले?

खडसेंच्या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथराव खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील युद्ध असेच चालते, पण पुन्हा बंद पडते. हे युद्ध कायम चालत राहिले पाहिजे. कोणतीही गोष्ट हातात घेतली म्हणजे ती धसास लावली पाहिजे. खडसे यांच्या रुपाने फडणवीस यांनी आमच्या उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे. बोलायचे आणि पुन्हा बंद करायचे, हे माझ्या स्वभावात बसत नाही. खडसेंनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते असंही गुलाबराव पाटील म्हणाले होते.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

माझ्यावर केवळ आरोप झाले म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं. मग आरोप झालेल्या पक्षाच्या इतर मंत्र्यांना तो न्याय का लावला गेला नाही, असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. मग अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो काय पदाचा सदुपयोग होता का? असा प्रश्न खडसेंनी विचारला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस अ‍ॅक्सिस बँकेत काम करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला होता. तोच मुद्दा खडसेंनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीसांना मी मोठं केलं, पण...

देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष कसे झाले, हेदेखील एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं. 'मी देवेंद्र फडणवीस यांना २००५-२००६ पासून पाहतोय. ते अभ्यासू आणि होतकरू असल्यानं त्यांना मी संधी दिली. अनेकदा विधानसभेत माझ्या ऐवजी त्यांना पुढे केलं. पण आपण ज्यांच्यावर प्रेम केलं, ते पुढे जाऊन असे उतराई होतील असं वाटलं नव्हतं,' अशा शब्दांत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. 'सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष असताना चांगलं काम करत होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत आला. त्यांनाच पुन्हा संधी दिली जावी, असं राज्य भाजपामधील अनेकांना वाटत होतं. त्यावेळी राजनाथ सिंह पक्षाचे अध्यक्ष होते. एकदा गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले. देवेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस तुम्ही सिंह यांच्याकडे करा, असं मुंडे म्हणाले. गोपीनाथजी माझे नेते होते. मी त्यांचा सन्मान केला. राजनाथ यांना फोन करून मी देवेंद्र यांचं नाव सुचवलं आणि मग देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाले,' अशा शब्दांत खडसेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

देव तारी त्याला कोण मारी! खेळता खेळता २ वर्षाच्या बहिणीला भावाने रेल्वेसमोर फेकले, तितक्यात...

“महाराष्ट्र अस्मिता अन् मराठी माणसासाठी लढलो म्हणून तुरुंगात टाकणार असाल तर माझी तयारी"

भाजपाचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; खासदार शरद पवारांची महत्त्वाची बैठक सुरु

...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड! विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला

 

Web Title: Eknath Khadse cannot go to the other Political Party Said BJP leader Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.