Opponents BJP Leader MLA Atul Bhatkhalkar Criticized CM Uddhav Thackeray over Mumbai Water Logging | ...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड! विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला

...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड! विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला

ठळक मुद्देमुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले.महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली. संततधार पावसात मुंबईकरांची परवडउपनगरातील पालकमंत्री आदित्य ठाकरे उपनगराकडे फिरकायला तयार नाही,

मुंबई – शहरात मंगळवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले, वरळी, प्रभादेवी, हिंदमाता, अंधेरी, मालाड, कांदिवली याठिकाणी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले, रस्ते जलमय झाले तर वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली. मुंबईच्या पावसाने सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत केले.

तर मुंबईच्या पूरसदृश्य परिस्थितीवरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली. संततधार पावसात मुंबईकरांची परवड. महापालिका मख्ख, राज्य सरकार ढिम्म, मुंबईकर बेहाल त्यासाठी दार उघड भावा दार उघड अशा शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

याबाबत अतुल भातखळकर म्हणाले की, मुंबई महापालिकेने रात्रीच्या पावसात पुन्हा एकदा शहर तुंबवून दाखवलं, नालेसफाई टक्केवारी, कोविड सेंटरमधील टक्केवारी, महापौरांवर आरोप, या भ्रष्टाचाराने लडबडलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारामुळे सर्वसामान्य मुंबईकरांवर ही परिस्थिती उद्भवली आहे. उपनगरातील पालकमंत्री आदित्य ठाकरे उपनगराकडे फिरकायला तयार नाही, ते केवळ पर्यटनात आणि ताज महाल हॉटेलच्या करारात रमले आहेत, आतातरी पालकमंत्र्यानी दौरा करावा आणि झोपडपट्टीतील लोकांसाठी प्रत्येक १० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

याबाबत भाजपा आमदार आशिष शेलार म्हणाले की, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला.

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

 मुसळधार पावसाने मुंबईला पुन्हा एकदा चांगलेच झोडपले आहे. मंगळवारी सायंकाळपासून तुफान पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरात काही ठिकाणी भागांत पाणी भरले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईत मंगळवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. दादर, वरळी, सायन, घाटकोपर, साकीनाका आणि चेंबूर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. गोरेगावमध्ये अनेक रस्ते जलमय झाले आहेत. मालाड, अंधेरी, खार या भागांतही पाणी साचले असून बेस्टने अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे. याबाबत मुंबई पालिकेने  ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

गोरेगावच्या मोतीलाल नगरमधील नागरिकांच्या घरात शिरले पाणी!

गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर क्रमांक 1 येथील नागरिकांच्या घरात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी शिरले. मध्यरात्री दोन वाजता येथील घरांमध्ये शिरलेले पाणी सकाळी सहाच्या सुमारास काही प्रमाणात ओसारले अशी माहिती येथील उदय सोसायटीत राहणारे नागरिक समीर राजपूरकर यांनी दिली. सुमारे २६०० बैठी घरे असलेला सदर परिसर हा सखल भागात असल्याने एक तास जरी पाऊस पडला तरी येथील घरात सुमारे दोन ते तीन फूट पाणी शिरते आणि अनेक कुटुंबीयांचे संसार पाण्याखाली तरंगतात. गेल्या १५ वर्षात येथील अनेक नागरिक आपली घरे विकून दुसरीकडे राहायला गेली. मात्र, पालिका प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Opponents BJP Leader MLA Atul Bhatkhalkar Criticized CM Uddhav Thackeray over Mumbai Water Logging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.