Dont see the end of the people who will stop the outbreak udayanraje bhosale warning on Maratha reservation | लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार? मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा

लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार? मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा दिला आहे. "मला नेत्यांना एकच सांगायचंय. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार? हा उद्रेक एक ना एक दिवस नक्की होईल", असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते. 

साताऱ्यात अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या स्थापना कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. 

"मराठा आरक्षणावरुन होणारं राजकारण थांबायला हवं. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करायला हवा. नरेंद्र पाटलांनी आज अण्णासाहेब फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी त्यांचं आयुष्य मराठा समाजासाठी अर्पण केलं आहे. आपल्याकडे पुढची पिढी आशेनं पाहते आहे. त्यामुळे मला नेत्यांना विनंती करायचीय की लोकांचा अंत पाहू नका, एकदा का उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार? हा उद्रेक एक दिवस नक्की होईल", असं उदयनराजे म्हणाले. 

दुसऱ्यांचं आरक्षण आम्हाला नको
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरही उदयनराजे यांनी भाष्य केलं. "दुसऱ्यांचा लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही?", असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला. सर्वांना वाटतं मराठा समाज फार सधन आहे. मात्र, मराठा समाजातील मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती वाईट आहे ही वस्तुस्थिती स्वीकारायला हवी. आज जास्त मार्क मिळवूनही विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळत नसेल तर हा मराठा समाजावरील अन्याय आहे, असंही उदयनराजे म्हणाले. 

...त्या लोकप्रतिनिधींचा पाठीशी उभं राहू नका
तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर तुमच्या अधिकारासाठी तुम्हाला साथ देणार नसतील तर तुम्हीपण अशा लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभं राहू नका. तुमच्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, असं उदयनराजे यावेळी म्हणाले. 
 

Web Title: Dont see the end of the people who will stop the outbreak udayanraje bhosale warning on Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.