CoronaVirus Live Updates cm shivraj singh chouhan targets maharashtra government on oxygen machines | CoronaVirus Live Updates : "दबाव टाकला जातोय, महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवतंय"; शिवराज सिंह चौहानांचा गंभीर आरोप

CoronaVirus Live Updates : "दबाव टाकला जातोय, महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवतंय"; शिवराज सिंह चौहानांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा (Corona Virus) कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात दरम्यान मध्य प्रदेश सरकारने (MP Government) महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ऑक्सिजन खरेदीवरुन शिवराज सिंह चौहानांनी (Shivraj Singh Chouhan) ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दबाव टाकला जातोय तसेच महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवित आहे असा आरोप करण्यात आला आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाबाबतच्या चर्चेसाठी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मध्य प्रदेशने महाराष्ट्रातील निर्माता कंपन्यांकडे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची (Oxygen Concentrator) ऑर्डर दिली होती, मात्र महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) टाकलेल्या दबावामुळे ती ऑर्डर पाठवण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सरकार मध्य प्रदेशचे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन न पाठवण्यासाठी हे तयार करणाऱ्या कंपनीवर दबाव टाकत आहे असा मोठा आरोप शिवराज सिंह चौहान यांच्याकडून करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यामध्ये कोरोना काळात सध्या उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडिसिवीर इंजेक्शनची उपलब्धता याबाबत माहिती दिली. याच बैठकीदरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी "मध्य प्रदेशात सध्या 2000 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आले आहेत, तर 650 कॉन्सनट्रेटर अजून येणार आहेत. 1300 कॉन्सनट्रेटर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी केले आहेत. मात्र महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीन तयार करणाऱ्या कंपन्यांवर मध्यप्रदेशच्या आधी महाराष्ट्राला पुरवठा करावा यासाठी दबाव टाकत आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"100 दिवस टिकणार कोरोनाची दुसरी लाट, 70 टक्के लसीकरण अत्यावश्यक"; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

देशात कोरोना लसीकरण देखील वेगाने होत आहे. दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांसाठी एका तज्ज्ञाने (Expert) तयार केलेल्या रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूची दुसरी लाट अजून 100 दिवस कायम राहू शकते. तसेच 70 टक्के कोरोना लसीकरण अत्यावश्यक असल्याचं देखील म्हटलं आहे. हर्ड इम्युनिटीमुळे लोकांना संसर्गजन्य रोगांपासून अप्रत्यक्ष संरक्षण मिळतं. लसीकरणानंतर किंवा संसर्गानंतर बरं झाल्यानंतर लोकांची प्रतिकारक शक्ती विकसित होते. लोकांच्या सामूहिक रोग प्रतिकारक शक्तीला हर्ड इम्यूनिटी म्हणतात. डॉ. नीरज कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमध्ये लोकांची प्रतिकारक शक्ती कमी करण्यासोबतच लसीचा प्रभाव कमी करण्याची क्षमता देखील या व्हायरसमध्ये आहे. कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन पूर्वीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक संक्रामक आहे. त्यामुळे ज्या लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. अशा लोकांनाही कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

English summary :
CoronaVirus Live Updates cm shivraj singh chouhan targets maharashtra government on oxygen machines corona virus

Web Title: CoronaVirus Live Updates cm shivraj singh chouhan targets maharashtra government on oxygen machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.