भाजपनं देशाला अधोगतीकडे नेलं; काँग्रेसचा विचारच देशाला, संविधानाला वाचवू शकतो : नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 20:47 IST2021-06-12T20:46:31+5:302021-06-12T20:47:59+5:30
Nana Patole : नाना पटोले यांनी साधला भाजपवर निशाणा. २०२४ मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, पटोले यांचं वक्तव्य.

भाजपनं देशाला अधोगतीकडे नेलं; काँग्रेसचा विचारच देशाला, संविधानाला वाचवू शकतो : नाना पटोले
"राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग हा फक्त मोझरी परिसरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण वाटचाल करू. महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आधार घेऊनच ते सरकार काम करेल," असा मानस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. पटोले हे विदर्भ दौऱ्यावर असून अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रावर निशाणा साधत भाजप सरकारनं देशाला अधोगतीकडे नेल्याचं म्हटलं.
"विदर्भाच्या दौऱ्यात आपण कष्टकरी, कामकरी, शेतकरी, गरिबांच्या व्यथा पाहिल्या आहेत. कोरोनामुळे या लोकांचे जगणे अवघड झाले आहे. एकीकडे कोरोनाशी सामना तर दुसरीकडे जगण्याची धडपड सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारने लोकांना जाणीवपूर्वक मरणाच्या दारात आणून ठेवले आहे. ऑक्सीजन, रेमडेसीवर या औषधांचा पुरवठा केंद्र सरकार करते तो वेळेवर व पुरेसा न केल्यामुळे हजारो लोकांचे जीव गेले. आताही बुरशी आजारावरचे इंजेक्शन केंद्राकडून वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नाही," पटोले यावेळी म्हणाले.
भाजप सरकारनं देशाला अधोगतीकडे नेलं
"शेतकरी सहा महिन्यापासून आंदोलन करत आहेत, पण पंतप्रधान मोदींना या शेतकऱ्यांशी बोलावयास वेळ नाही. भाजपचे सरकार देशाला अधोगतीकडे घेऊन गेले आहे. काँग्रेसचा विचारच या देशाला वाचवू शकतो, संविधानाला वाचवू शकतो," असेही त्यांनी यावेळी नमूद केले.