BJP's attempt to prevent stockpiling of Remedesivir in the state; Allegation of Nawab Malik | राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न; नवाब मलिक यांचा आरोप 

राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न; नवाब मलिक यांचा आरोप 

ठळक मुद्देसाठेबाजाला वाचवण्यासाठी राज्यातील भाजप जातेय याचा अर्थ काहीतरी काळंबेरं आहे : नवाब मलिकपोलिसांना निर्यात करणार्‍या कंपन्याकडे औषधाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती, मलिक यांची माहिती

"रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये दोन विरोधी पक्षनेते आणि दोन आमदार साठेबाजाला वाचवण्यासाठी जातात यामागे काही तरी काळंबेरं आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले. रेमडेसिवीरचा साठा करणार्‍या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजप का घाबरलीय? राज्यातील भाजप वकिली करण्यासाठी का जातेय याचं उत्तर भाजपने जनतेला द्यायला हवे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.  

"देशात आणि राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना या निर्यातीवर केंद्राने बंदी घातली आहे. देशात ७ कंपन्याना देशातंर्गत विक्रीची तर दोन कंपन्यांना परदेशात विक्रीची परवानगी दिली आहे. याउलट १७ कंपन्यांना निर्यात करण्याची परवानगी आहे. याच कंपन्या परदेशात विक्री करणाऱ्या दोन कंपन्यांना निर्यात करत आहेत. निर्यात बंदी घातल्यानंतर ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे राज्य सरकारकडे आले आणि आमच्याकडे रेमडेसिवीरचा साठा आहे तो विकण्याची परवानगी द्या अशी मागणी केली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासोबत राजेश डोकानिया यांनी भेट घेतली होती," असेही नवाब मलिक यांनी सांगितले. 

पोलिसांना मिळाली होती माहिती

"पोलिसांना निर्यात करणार्‍या कंपन्याकडे औषधाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारावर राजेश डोकानिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी बीकेसी येथील पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. त्यांच्याकडे माहिती गोळा करण्याचे काम पोलीस करत असतानाच रात्री ११.१५ वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार पराग अळवणी पोचले. डोकानिया यांना सोडवण्यासाठी राज्याचे दोन विरोधी पक्षनेते व दोन आमदार का गेले?," असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. ज्यांच्याकडे साठा आहे ते स्वतः खरेदी करून आणि स्वतः विकू अशी भूमिका भाजप घेत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. 

शनिवारी सगळी परिस्थिती झाल्यावर एफडीएने रात्री दहा वाजता परवानगी दिली होती. त्याची कॉपी दाखवल्यावर राजेश डोकानिया यांना माहिती घेऊन सोडून दिले. गरज पडल्यास पुन्हा बोलावू असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस यंत्रणा जनतेसाठी काम करतेय. काळाबाजार रोखण्यासाठी काम करतेय. साठा असेल तो जप्त करून लोकांना दिला पाहिजे या भूमिकेतून काम करतेय असेही नवाब मलिक म्हणाले.

फडणवीस वकील म्हणूनच...

"देवेंद्र फडणवीस वकील आहेत. म्हणूनच ते राजेश डोकानियासाठी वकीलपत्र घेऊन त्याची बाजू मांडत होते. राजेश डोकानियाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजप का घाबरलीय," असा सवालही नवाब मलिक यांनी केला. राज्याच्या हितासाठी पोलीस आणि राज्याची एफडीए यंत्रणा काम करतेय. मग दोन तासासाठी चौकशीला पोलिसांनी बोलावल्यावर राज्यातील भाजपचे प्रमुख जातात यामध्ये त्यांचा राजेश डोकानियांबरोबर संबंध काय आहेत याचा खुलासा भाजपने करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Web Title: BJP's attempt to prevent stockpiling of Remedesivir in the state; Allegation of Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.