डॉक्टर साहेब प्रामाणिकच होते, त्यांच्या हाताखालच्यांनी प्रत्येक विभागात घोटाळे केले : अनुराग ठाकुर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 16:49 IST2021-02-12T16:46:54+5:302021-02-12T16:49:06+5:30
Anurag Thakur in Rajya Sabha : मोदी सरकार हे देशाला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल, अनुराग ठाकुर यांचा विश्वास

डॉक्टर साहेब प्रामाणिकच होते, त्यांच्या हाताखालच्यांनी प्रत्येक विभागात घोटाळे केले : अनुराग ठाकुर
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी शुक्रवारी राज्य सभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. एअर इंडियाची परिस्थिती कोणामुळे खालावली आणि देशातील ६ विमानतळांच्या खासगीकरणाची सुरूवात कोणी केली होती? असा सवाल ठाकुर यांनी सार्वजनिक संपत्ती विकण्याच्या आरोपावरून केले. यावेळी अनुराग ठाकुर यांनी युपीए सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा मुद्दादेखील उपस्थित केला. "डॉक्टरसाहेब (माजी पंतप्रधान मनमोहन सिंग) प्रामाणिकच व्यक्ती होते. परंतु त्यांच्या खाली काम करत असलेल्यानी कदाचितच असा कोणता विभाग सोडला ज्यात घोटाळा झआला नाही. आज सात वर्षांच्या मोदी सरकारच्या कालावधीत सात पैशांचाही घोटाळा झाला नाही. हे प्रामाणिक सरकार असतं," असं ठाकुर म्हणाले.
"आज व्याजदर कमी होत आहेत अनेक सुविधा मिळत आहेत. यामुळे सामान्य व्यक्तींना गरीबांना घरं मिळत आहेत. मोदी सरकार हे देशाला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल," असा विश्वासही ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केला. आज स्मार्टफोन्सचा सर्वात मोठा उत्पादक गेश म्हणून भारत पुढे आला आहे. देशात सात मोठे टेक्सटाईल पार्क उभारले जाणार आहे. हा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी देशातील अनेक तज्ज्ञांशी चर्चा आणि सल्ले घेण्यात आले. यापूर्वी देशात पीपीई किट तयार होत नव्हते. परंतु आज ते आपण अन्य देशांना देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी अनुराग ठाकुर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी सरकारच्या काही धोरणांमुळे बंगालच्या लाखो शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेता आला नाही. ज्यांची नजरच काळी आहे त्यांना सर्वच काळं दिसत असल्याचं म्हणत ठाकुर यांनी नव्या कृषी कायद्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला.