पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना ''आम्ही तुमचे बाप आहोत" असे म्हणाले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी "चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढण्याची भाषा सारखी करत आहात" असा प्रतिहल्ला चढवला होता. यानंतर आता 'बाप' हा सहज वापरला जाणारा शब्द असून कुणाचाही 'बाप' काढला नाही असं पाटील यांनी म्हटलं आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी "बापाची पेंड हा सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे. त्या शब्दाचा मी वापर केला. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. मी कुणाचाही बाप काढला नाही" अशी सारवासारव केली आहे. तसेच हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय? असं देखील म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (15 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच आपल्या विधानावरही त्यांनी खुलासा केला आहे. 

"कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता"

"मराठीत अनेक शब्द सहजपणे वापरले जातात. त्यापैकी बाप हा सुद्धा एक शब्द आहे. तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण सहज म्हणतो. पुणे प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्हीही बाप आहोत असं मी म्हणालो. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता. अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय?" असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

"लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये दिल्लीत कुणाचा बाप बसलाय; हे सर्वांनी पाहिलेलं आहे" 

चंद्रकांत पाटलांनी आपल्या ट्विटरवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले,  गेल्या दोन निवडणुकांमध्ये दिल्लीत कुणाचा बाप बसला आहे हे सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांच्या वारसदारांची काळजी तुम्ही करू नये. विचारांनी सरळमार्गी असणाऱ्या लोकांचे अनेक वैचारिक वारसदार असतात. आणि तुमच्यासारख्या दृष्ट प्रवृत्तींना शह देण्यासाठी ते सदैव तत्पर राहतात. याप्रकारे पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.  "शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेला आम्ही आमचे मायबाप समजतो. त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच त्यांची जर कोणी फसवणूक करणार असेल तर त्यांच्या फायद्यासाठी असणाऱ्या विधेयकाला विरोध करत असेल तर आम्ही सदैव संघर्ष करणार आहोत" असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.  

राष्ट्रवादीने 'या' शब्दात दिले होते चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर.... 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले होते , "चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषासारखे करत आहात. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने आणलेले विधेयके हे शेतकरी आणि कामगार यांच्यावर अन्याय करणारे आहेत. हे विधेयके त्यांच्या हिताचे नाही. जर ते शेतकरी व कामगारांच्या फायद्याचे असते तर आम्ही आनंदाने त्या विधेयकांचे समर्थन केले असते. परंतु, हे विधेयके कामगारांवर अन्याय करणारे असून फक्त मालक धार्जिणे आहेत. मोदी सरकारचे  उद्योगपतींसाठी बाजारपेठ उभी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. राज्यात भाजपाची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे?"


 

Web Title: bjp chandrakant patil reaction on his statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.