योगा प्रशिक्षक विवाहितेनं हाताची शीर कापून घेतला गळफास; पिंपरीच्या सांगवीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 16:12 IST2021-09-20T16:09:41+5:302021-09-20T16:12:49+5:30
पिंपरी-चिंचवड शहर स्तरावर विवाहित महिलांसाठी झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेत त्यांनी सौंदर्यवती म्हणून बहुमान पटकावला होता

योगा प्रशिक्षक विवाहितेनं हाताची शीर कापून घेतला गळफास; पिंपरीच्या सांगवीतील धक्कादायक घटना
पिंपरी : योगा प्रशिक्षक असलेल्या विवाहितेनं राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. सांगवी येथे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
विशाखा दीपक सोनकांबळे (वय ३७, रा. सांगवी), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विशाखा या त्यांचे पती दीपक तसेच दहा वर्षांचा मुलगा व सहा वर्षांची मुलगी यांच्यासोबत सांगवी येथे भाडेतत्वावरील फ्लॅटमध्ये राहण्यास होत्या. रविवारी रात्री त्यांचे पती दीपक हे मुलगा व मुलगी यांच्यासह घराच्या हॉलमध्ये झाेपले. त्यानंतर विशाखा यांनी बेडरुममध्ये डाव्या हाताची शीर कापली. त्यानंतर ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला.
पती दीपक हे सकाळी झोपेतून जागे झाले असता बेडरुममध्ये विशाखा यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विशाखा यांना सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच विशाखा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान सोनकांबळे यांच्या घरातील डायरीवर रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी डायरी ताब्यात घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप समजे शकलेले नाही.
सौंदर्यवती म्हणून बहुमान पटकावला होता
विशाखा सोनकांबळे या योगा प्रशिक्षक म्हणून योगाचे क्लास घेत होत्या. तसेच पिंपरी-चिंचवड शहर स्तरावर विवाहित महिलांसाठी झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेत त्यांनी सौंदर्यवती म्हणून बहुमान पटकावला होता. तसेच इतर सामाजिक कार्यातही त्या पुढाकार घेत असत.