रुग्णांना चढवले चुकीचे रक्त; नवीन थेरगाव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, एक जण आयसीयूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:55 IST2025-07-11T12:53:25+5:302025-07-11T12:55:17+5:30
‘ए’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रुग्णाला ‘बी’ पॉझिटिव्ह व ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त लावण्यात आले

रुग्णांना चढवले चुकीचे रक्त; नवीन थेरगाव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, एक जण आयसीयूत
पिंपरी : महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात दोन रुग्णांना रक्तगटांची अदलाबदल झालेले रक्त चढविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांतील एकाला त्रास होऊ लागल्याने अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलविण्यात आले. मात्र, दुसऱ्याला अतिदक्षता विभागात जागा नसल्याने वॉर्डातच ठेवण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असून बुधवारी (दि. ९) रात्री आठच्या सुमारास महिला मेडिसिन वॉर्डात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला वॉर्डातील बेड क्रमांक चार व आठ या रुग्णांना रक्त भरण्यासाठी डॉक्टरांनी चिठ्ठी दिली. त्यांतील एकाचा रक्तगट ‘ए’ पॉझिटिव्ह व दुसऱ्याचा ‘बी’ पॉझिटिव्ह होता. त्यानुसार परिचारिकांनी पिशवीतील रक्त देण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच वॉर्डातील आणखी एका रुग्णाला रक्त द्यायचे होते. डॉक्टरांनी तशी सूचना दिली होती. या रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या पिशवीचे फोटो डॉक्टरांना पाठवायचे होते. मात्र, आधीच्या रुग्णांच्या रक्ताच्या पिशव्यांचे फोटो पाठवायचे आहेत, असा परिचारिकेचा समज झाला. त्यात परिचारिकेकडे मोबाइल नसल्याने तिने दोन्ही रक्तपिशव्या काउंटरवर आणल्या व दुसऱ्याच्या मोबाइलवरून डॉक्टरांना फोटो पाठवले.
मात्र, त्या रक्ताच्या पिशव्या लावताना त्यांची अदलाबदल झाली. परिणामी ‘ए’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रुग्णाला ‘बी’ पॉझिटिव्ह व ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त लावण्यात आले. सुमारे १५ ते २० मिनिटांनंतर बेड क्रमांक आठवरील रुग्णाला त्रास होऊ लागल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ उपस्थित परिचारिकांना ही माहिती सांगितली. त्यानंतर मात्र सर्वांचीच पळापळ सुरू झाली. मेडिसिन विभागाचे प्रमुखही दाखल झाले.
बेड क्रमांक आठवरील रुग्णाला तातडीने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले, तर अतिदक्षता विभागात बेड रिक्त नसल्याने बेड क्रमांक चारवरील रुग्णाला वॉर्डातच ठेवण्यात आले. या रुग्णाला त्रास झाला नाही. अतिदक्षता विभागातील रुग्णाला रात्रभर तेथेच ठेवण्यात आले. तो स्थिर झाल्यानंतर सकाळी वॉर्डात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, त्यानंतर नातेवाइकांनी रक्त भरण्यास नकार दिला.
आयसीयूमधून दागिने लंपास
आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णाचे दागिने लंपास झाल्याची तक्रार नातेवाइकांनी केली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही तपासले असल्याची माहिती मिळाली.
कर्मचाऱ्यांचा आळस बेतला असता जिवावर
डॉक्टरांना फोटो पाठवायचे होते, तर रुग्णांना लावलेल्या रक्ताच्या पिशव्या काढून काउंटरवर आणण्याची गरज नव्हती. जागेवर जाऊनही मोबाइलमध्ये फोटो काढता आले असते. मात्र, कर्मचाऱ्यांचा आळस किंवा बालिशपणा रुग्णांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली होती.
रक्त बदलण्याचा प्रकार घडला नसून आयसीयूत दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला अगोदरच त्रास होत होता. आयसीयूत दागिने चोरीला गेल्याची नातेवाइकांची तक्रार आहे. मात्र, ही तक्रार पोलिसांशी संबंधित आहे.- डॉ. राजेंद्र फिरके, प्रमुख, नवीन थेरगाव रुग्णालय.