घरकुलातील १६० इमारतींचे फायर ऑडिट कधी करणार?पिंपरी महापालिका म्हणते, आमची जबाबदारी नाही
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 19, 2024 17:00 IST2024-12-19T17:00:07+5:302024-12-19T17:00:31+5:30
मागील दहा वर्षांपासून या इमारतीत आगीची घटना घडू नये, म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव फायर ऑडिट करावे, अशी मागणी रहिवासी करतायेत

घरकुलातील १६० इमारतींचे फायर ऑडिट कधी करणार?पिंपरी महापालिका म्हणते, आमची जबाबदारी नाही
पिंपरी : महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना चिखली प्राधिकरण येथे १६० घरकुल संकुल इमारतींची उभारणी केली आहे. त्या इमारतीत २० ते २५ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. त्या इमारतीत सुरक्षेसाठी फायर कीट बसवलेले आहेत; पण मागील दहा वर्षे झाले, या इमारतीत आगीची घटना घडू नये, म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव फायर ऑडिट करावे, अशी मागणी रहिवासी करत आहेत. मात्र, महापालिका त्यांच्याकडे जबाबदारी झटकत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
महापालिकेच्या आर्थिक दुर्बल घटकातील बांधलेल्या घरकुलचे फायर ऑडिट करण्यात यावे, या मागणीकडे आयुक्तांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. त्यानंतर ३ ऑक्टोबर २०२३ला स्मरणपत्र देण्यात आले. आता तरी फायर ऑडिट होईल, अशी अपेक्षा ठेवली होती. त्याही आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, महापालिकेने आग लागण्यापूर्वीच नागरिकांच्या जीवाची काळजी घ्यावी, महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आहे. अग्निसुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी व फायर ऑडिट न केल्यामुळे नागरिकांचे जिवंत हानी व वित्तहानी होत आहे. त्याला महापालिकेचे आयुक्त जबाबदार असतील, असाही आरोप स्थानिक रहिवासी नागरिक करीत आहेत.
दहा वर्षांत फायर ऑडिटच नाही...
शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल संकुलमध्ये १६० इमारती बांधून त्याला दहा वर्षे झाली आहेत. त्या इमारतीमध्ये हजारो नागरिक राहत आहेत. त्या रहिवासी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक इमारतीमध्ये अग्नीची घटना घडू नये, म्हणून फायर कीटदेखील बसवलेले आहे; पण त्या फायर कीट दहा वर्षे जुने झाले आहेत.
आग लागण्याच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. महापालिकेकडे सर्व यंत्रणा सज्ज असूनदेखील त्या यंत्रणेचा कुठल्या ही सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी वापर केले जात नाही. सामान्य जनतेसाठी त्यांच्या सुरक्षाबाबत महापालिकेने योग्य ती खबरदारी घ्यावी, घरकुल संकुलातील सर्व इमारतीचे फायर ऑडिट करून देण्यात यावे. -शांताराम खुडे, स्थानिक रहिवासी
महापालिका म्हणते, आमची जबाबदारी नाही...
घरकुलमधील इमारतीची जबाबदारी महापालिकेकडे नाही. संबंधित सोसायट्यांनी स्वत: फायर ऑडिट करून घेऊन त्याचा रीतसर अहवाल महापालिकेकडे द्यावा लागतो, त्यामुळे त्यांनी त्यांचे स्वत: फायर ऑडिट करून घेण्याचे महापालिकेने वारंवार कळविले आहे. -प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका