पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढायला हवं; कार्यकर्त्यांची मागणी, अजित पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 20:46 IST2025-11-06T20:46:16+5:302025-11-06T20:46:32+5:30
राष्ट्रवादीचा गड कायम ठेवण्यासाठी स्वबळावरच लढले पाहिजे, अन्यथा पुन्हा हातातून सत्ता जाईल अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढायला हवं; कार्यकर्त्यांची मागणी, अजित पवार म्हणाले...
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाची बैठक गुरुवारी (दि ६) मुंबईतील वरळी येथे झाली. त्यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वबळाची मागणी केली. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत. स्वबळाबरोबरच काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करावी लागेल, असे सुचित केले.
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक मुंबई येथे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, माजी उपमहापौर राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
'स्वबळावरच लढले पाहिजे' ची मागणी
सुरुवातीला शहरातील निवडणुकीबाबतचा आढावा पवार यांनी घेतला. त्यावर सुरुवातीलाच स्थानिक जेष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवरची परिस्थिती सांगितली. पिंपरी- चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचा गड कायम ठेवण्यासाठी स्वबळावरच लढले पाहिजे, अन्यथा पुन्हा हातातून सत्ता जाईल, अशी मागणी मागणी केली. भाजप किंवा शिवसेनेबरोबर युती करू नये, आपल्या उमेदवारावर अन्याय होईल, अशीही मागणी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद पवार यांनी दिली.
कोण कुणाचा पत्ता कट करणार नाही
अजित पवार म्हणाले, 'महापालिका निवडणुकीची स्थानिक पातळीवरील पार्श्वभूमी पाहता, ही निवडणूक स्वबळावर लढावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागा. पिंपरी- चिंचवडमध्ये आपण काम केले आहेत. २०१७ चा अपवाद वगळता, पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व राहिले आहे. त्यासाठी सर्वांनी काम करा. इतर पक्षांमध्ये दिल्लीला विचारावे लागते. मात्र, आपल्याकडे असे नाही. मागील वेळी काम केले नाही म्हणून कोण कोणाचा पत्ता कट करेल, असं काही होणार नाही. कुणावरही अन्याय होणार नाही. निवडणुकीवर माझं थेटपणे लक्ष असेल. काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याला मैत्रीपूर्ण लढत करावी लागेल. '
योगेश बहल म्हणाले, 'स्थानिक नेत्यांनी आपापली मत मांडली. त्यानंतर अजितदादांनी मार्गदर्शन केले. महापालिका निवडणूक आरक्षण सोडत झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊ. आता निवडणुकीसाठी मतदार याद्या पाहून घ्या, तयारी करा, सर्वानी एकजुटीने काम करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. तसेच शहराची विविध विभागांची कार्यकारणी तयार केली आहे. त्यास मंजुरी दिली. दोन दिवसात कार्यकारणी जाहीर होईल.'