शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर

By प्रकाश गायकर | Updated: December 24, 2024 15:17 IST2024-12-24T15:16:37+5:302024-12-24T15:17:56+5:30

माध्यमिक शाळांतील सीसीटीव्ही दुरुस्तीसाठी पुन्हा निविदा : कोट्यवधींचा खर्च

Vision in the third eye weakened in just three years | शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर

शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये साडेचार कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्हींची दुरुस्ती आणि नवीन कॅमेरे बसवण्यासाठी वारंवार निविदा काढत वारेमाप खर्च केला जात आहे. गतवर्षी दुरुस्तीसाठी २७ लाखांचा खर्च केल्यानंतर पुन्हा आता दुरुस्ती व नवीन कॅमेरे बसवण्यासाठी ३ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील १६ माध्यमिक शाळांमध्ये प्रशासनाच्या वतीने साडेचार कोटी रुपये खर्च करून २०२१ मध्ये कॅमेरे बसवण्यात आले. अवघ्या तीन वर्षांमध्ये या कॅमेऱ्यांची नजर कुमकुवत झाल्याने गेल्यावर्षी प्रशासनाने कॅमेरे दुरुस्ती करण्यासाठी निविदा काढली. या कॅमेऱ्यांच्या यंत्रणेची एक वर्ष देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी २६ लाख ६९ हजार ९१८ रुपये खर्चाची निविदा काढली होती. त्यासाठी ४ ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी ३ ठेकेदारांच्या निविदा पात्र ठरल्या. फिनिक्स इन्फ्रा स्ट्रक्चर्स या ठेकेदार कंपनीने ०.१५ टक्के कमी दर दिला. ती निविदा स्वीकारून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचे काम देण्यात आले.

त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे, तेच विद्युत विभागाने पुन्हा निविदा प्रक्रियेचा घाट घातला आहे. माध्यमिक शाळांमधील कॅमेऱ्यांचे नूतनीकरण, दुरुस्ती व आवश्यक ठिकाणी नवीन कॅमेरे बसवण्यासाठी निविदा काढली आहे. त्यासाठी २ कोटी ९३ लाख ५१ हजार १३२ रुपये खर्च होणार आहे.

तिजोरीवर ताण
सन २०२१ मध्ये नवीन कॅमेरे बसवल्यानंतर अवघ्या चार वर्षांत शाळांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक शाळांमधील कॅमेरे बंद पडलेले आहेत. तर कॅमेऱ्यांची देखभाल व्यवस्थित नसल्याने चित्र स्पष्ट न दिसणे, मध्येच कॅमेरे बंद होणे असे प्रकार घडत आहेत. असे असताना ठेकेदारांकडून व्यवस्थित काम करून न घेता नवीन काम काढत तिजोरीवर अतिरिक्त ताण टाकला जात आहे.

बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या शाळांमध्ये कॅमेरे आहेत, मात्र काही ठिकाणचे कॅमेरे दुरुस्त करणे आवश्यक आहे. तर काही ठिकाणी नवीन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी हे काम करण्यात येणार आहे.  - संजय खाबडे, सहशहर अभियंता, विद्युत विभाग

Web Title: Vision in the third eye weakened in just three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.