विलास लांडे, अजित गव्हाणे यांची शरद पवार गटातून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:13 IST2025-06-17T14:11:24+5:302025-06-17T14:13:49+5:30

अजित पवार गटात प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

Vilas Lande, Ajit Gavanhe expelled from Sharad Pawar group | विलास लांडे, अजित गव्हाणे यांची शरद पवार गटातून हकालपट्टी

विलास लांडे, अजित गव्हाणे यांची शरद पवार गटातून हकालपट्टी

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात दाखल झालेले माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पत्रकारांना दिली.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठे यश मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह २८ जणांनी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी घेतली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला, तेव्हापासून ते शरद पवार गटापासून दूर होते. त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना बोलावून घेऊन पक्षात प्रवेश करण्याची गळ घातली होती. त्यानंतर गव्हाणे यांच्या स्वगृही परतण्याची चर्चा होऊ लागली होती. मात्र, त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका घेणार आहे, असे सांगितले होते. ते मंगळवारी अजित पवार गटात प्रवेश घेत असल्याची चर्चा रंगली असतानाच सोमवारी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी गव्हाणे आणि लांडे यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.

बेईमानी केल्याने पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार कारवाई

तुषार कामठे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नगरसेवक अन्य पक्षांतून शरद पवार गटात आले. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अजित गव्हाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला होता. त्यांनी निवडणूकही लढवली. निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये सक्रिय होणे आवश्यक होते. मात्र, तसे न होता ते दुसऱ्या गटाच्या संपर्कात होते. अजित पवार गटाच्या मेळाव्याच्या फलकांवर त्यांचे फोटो झळकले होते. त्यांना पक्षाने संधी दिली. विधानसभेचे तिकीट दिले; मात्र त्यांनी बेईमानी केली. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Vilas Lande, Ajit Gavanhe expelled from Sharad Pawar group