चारचाकीला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू, म्हाळुंगे नांदे रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:42 IST2025-01-16T16:42:37+5:302025-01-16T16:42:37+5:30
चारचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता

चारचाकीला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू, म्हाळुंगे नांदे रस्त्यावरील घटना
पिंपरी : चारचाकी वाहनाला दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे नांदे रस्ता येथील शहीद सोपान पाडळेनगर येथे रविवारी (दि.१२) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
अल्ताफ महेबूब शेख (२१, रा. म्हाळुंगे गाव, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोहनलाल भाकरराम देवाशी (३०, रा. म्हाळुंगे गाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १४) बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रणव उमेश टाक (१९, रा. म्हाळुंगे गाव, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहनलाल हे त्यांच्या भावाचे दुकान बंद करून दुकानातील सामान ठेवण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन गेले होते. त्यावेळी प्रणव याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने चारचाकी गाडीला जोरात धडक दिली. यामध्ये प्रणव गंभीर जखमी झाला. दुचाकीवरील अल्ताफ शेख याचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार धुमाळ याप्रकरणी तपास करीत आहेत.