एक्सपायर कुरकुरे विकल्याचे सांगून उकळले अडीच लाख; दुकानदाराला धमकी, तिघांना अटक
By नारायण बडगुजर | Updated: January 16, 2025 18:26 IST2025-01-16T18:26:41+5:302025-01-16T18:26:52+5:30
किराणा दुकानातून नेलेले कुरकुरे खाल्ल्यामुळे राहुल पाटील यांना उलटी आणि जुलाब असा त्रास झाला, असे सांगून पैसे उकळले

एक्सपायर कुरकुरे विकल्याचे सांगून उकळले अडीच लाख; दुकानदाराला धमकी, तिघांना अटक
पिंपरी : एक्सपायरी झालेले कुरकुरे खाल्ल्याने एका व्यक्तीला जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाल्याचे दुकानदाराला सांगितले. हे प्रकरण मिटविण्यासाठी व तक्रार न करण्यासाठी दुकानदाराकडून अडीच लाख रुपये घेतले. या प्रकरणी तिघांना अटक केली. तळवडे येथे सोमवारी (दि. १३) आणि मंगळवारी (दि. १४) ही घटना घडली.
भूषण पंढरीनाथ पाटील (वय २७), राहुल सुभाष पाटील (२२), सुभाष चंपालाल पाटील (५१, तिघे रा. तळवडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किराणा दुकानदार रमेशकुमार लालाराम चौधरी (३७, रा. तळवडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांच्या किराणा दुकानातून नेलेले कुरकुरे खाल्ल्यामुळे राहुल पाटील यांना उलटी आणि जुलाब असा त्रास झाला, असे संशयितांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना बोलावून चौधरी यांचे दुकान बंद करण्याची धमकी दिली. तसेच चौधरी यांना शिवीगाळ करून हे प्रकरण मिटवण्यासाठी सुरुवातीला ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून अडीच लाख रुपये घेतले. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे तपास करीत आहेत.