विठ्ठल नगर वसाहतीत आग लागून वीस गाड्या जळून खाक; आगीच्या कारणाचा पोलीस घेतायेत शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 12:49 IST2023-12-24T12:49:31+5:302023-12-24T12:49:54+5:30
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ४ होजच्या ३ लाईन टाकून आगीवर नियंत्रण मिळवले

विठ्ठल नगर वसाहतीत आग लागून वीस गाड्या जळून खाक; आगीच्या कारणाचा पोलीस घेतायेत शोध
पिंपरी: नेहरूनगर परिसरातील अण्णासाहेब मगर स्टेडियम लगत असणाऱ्या विठ्ठलनगर वसाहतीत रविवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास वीस वाहने जळून खाक झाले आहेत. कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. गाड्या जळाल्या की जाळल्या याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावणेदोन च्या सुमारास लागले ची माहिती अग्निशामक दलास मिळाली. सोसायटीचे चेअरमन राजू कुऱ्हाडे यांनी अग्निशामक दलास आग लागल्याची प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
पिंपरी चिंचवड मनपा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केले असता आग मोठ्या प्रमाणात असल्याने भोसरी चिखली व मोशी उप अग्निशमन केंद्र येथील गाड्या घटनास्थळी बोलवण्यात आल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ४ होजच्या ३ लाईन टाकून आगीवर नियंत्रण मिळवले. धुराचे प्रमाण जास्त असल्याकारणाने वरच्या मजल्यावर असलेल्या घरांमध्ये जाऊन धुरामध्ये कोणी अडकले नाही. याची खात्री केली. या ठिकाणी अंदाजे २० वाहने जळाल्याचे निदर्शनास आले. आगीचे कारण समजू शकले नाही. ही आग विझवण्यासाठी विनायक नाळे, लीडिंग फायरमन विकास नाईक, फायरमन अमोल चिपळूणकर, अर्जुन जाधव, विकास कुटे, अभिषेक भांगे, संकेत शिंदे या पथकाने आग आटोक्यात आणली.