पिंपरी-चिंचवड मध्ये अल्पवयीन तीन मुली व दोन मुलांना फूस लावून पळवून नेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 15:37 IST2019-05-22T15:33:49+5:302019-05-22T15:37:48+5:30
अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे तीन वेगवेगळे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडले..

पिंपरी-चिंचवड मध्ये अल्पवयीन तीन मुली व दोन मुलांना फूस लावून पळवून नेले
पिंपरी : अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे तीन वेगवेगळे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडले. तसेच दोन अल्पवयीन मुलांनाही फूस लावून पळवून नेले. निगडी पोलीस ठाण्यात तीन तर चिखली आणि वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील ओटास्किम येथून एका १५ वर्षीय मुलीला आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मंगळवारी (दि. २१) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मुलीच्या ३७ वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल दत्ता कुदळे (रा. दळवीनगर, पत्राशेड, ओटास्किम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे.
दुसऱ्या प्रकरणात १७ वर्षे आठ महिने वयाच्या मुलीला कोणीतरी कशाचेतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. दि. १३ मे रोजी हा प्रकार घडला. मुलीच्या ४८ वर्षीय आईने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २१) फिर्याद दिली. तर १४ वर्षे नऊ महिने वयाच्या मुलाला कशाचे तरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. अल्पवयीन मुलाच्या ३८ वर्षीय आईने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चिखलीतील मोरेवस्ती येथून १६ वर्षीय मुलीला कशाचे तरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. सोमवारी (दि. २०) हा प्रकार घडला. मुलीच्या ३५ वर्षीय आईने मंगळवारी (दि. २१) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
चुलत्याकडे जातो असे सांगून गेलेला १७ वर्षीय मुलगा परतला नाही. त्यास कोणीतरी फूस लावून पळवून नेले. सोमवारी (दि. २०) हा प्रकार घडला. मुलाच्या वडिलांनी मंगळवारी (दि. २१) याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.