ठार मारून मगरींना खाऊ घालण्याची धमकी; पिंपरीत नाना गायकवाडसह मुलावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 13:33 IST2021-08-25T13:33:17+5:302021-08-25T13:33:37+5:30
गॅरेज चालकाच्या गॅरेजमधून तीन महागड्या चारचाकी आणि साहित्य, असे २५ लाख ६० हजारांचे साहित्य जबरदस्तीने नेले.

ठार मारून मगरींना खाऊ घालण्याची धमकी; पिंपरीत नाना गायकवाडसह मुलावर गुन्हा दाखल
पिंपरी : उद्योजक नाना गायकवाड याच्यासह त्याच्या मुलावर सांगवी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. व्याजाने दिलेल्या पैशांच्या कारणावरून गॅरेज चालकाला फार्म हाऊसवर नेले. पिस्तुलाचा धाक दाखवून ठार मारून मगरीला खाऊ घालण्याची धमकी दिली. तसेच गॅरेजमधून तीन महागड्या चारचाकी आणि साहित्य, असे २५ लाख ६० हजारांचे साहित्य जबरदस्तीने नेले. विशालनगर, पिंपळे निलख येथे जानेवारी ते ११ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली.
नानासाहेब शंकरराव गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे रा. औंध), राजाभाऊ अंकुश, ॲड. नाणेकर, अशी आरोपींची नावे आहेत. गॅरेज चालक विठ्ठल शिवानंद गुरव यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २३) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरव यांनी विशालनगर येथे सुरू केलेल्या कार हब या गॅरेजसाठी गायकवाडकडून कर्ज घेतले. ॲड. नाणेकर याने व्यवहाराची ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केली. त्यातील मजकूर वाचायला न देता त्यावर गुरव यांची सही घेतली. त्यांची कर्जाची काही रक्कम दिली. मात्र व्याज थकल्याने सूस, पुणे येथील आरोपीच्या फार्म हाऊसवर गॅरेज चालक गुरवला नेले.
तेथे जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी पिस्तुलातून हवेत तीनवेळा गोळीबार केला. त्यानंतर सुमारे १५ दिवसांनी गुरव यांच्या गॅरेजवर येऊन राजाभाऊने त्यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गॅरेजमधून २५ लाख ६० हजारांचे गॅरेजचे साहीत्य व मशीनरी तसेच गॅरेजमधील तीन चारचाकी वाहने जबरदस्तीने नेले. ठार मारून फार्म हाऊसवरील विहिरीत असलेल्या मगरींना खाऊ घालण्याची धमकी आरोपीने दिली.
नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या दोघांना पुणेपोलिसांनीअटक केली आहे. अन्य आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना झाली आहेत. सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे तपास करीत आहेत.