फोटो व्हायरल करून लग्न मोडण्याची धमकी; छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 21:04 IST2025-08-02T21:03:57+5:302025-08-02T21:04:37+5:30
पीडित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाइड नोट) लिहिली होती, त्यामध्ये दोघांच्या नावासहीत छळाचा उल्लेख केला होता

फोटो व्हायरल करून लग्न मोडण्याची धमकी; छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
पिंपरी : कॅफेमध्ये तरुणासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची तसेच लग्न मोडण्याची धमकी दिल्यानंतर या छळाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथे २४ जुलै रोजी ही धक्कादायक घटना घडली. वडगाव मावळ पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयितांना अटक केली आहे. रणजित राजेंद्र देशमुख (वय २६), अभिषेक अनिल ढोरे (दोघे रा. वडगाव, ता. मावळ) अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत.
या दोघांसह प्राण येवले याच्या विरोधातही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रणजित देशमुख याला पोलिस कोठडी तर अभिषेक ढोरे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी २६ जुलै रोजी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
वडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित देशमुख याने तरुणीसोबत कॅफेमध्ये फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी दिली. वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून कॉल करून तिचा मानसिक छळ केला. तिच्या आईवडिलांना मारण्याची आणि तिचे लग्न मोडण्याची धमकी दिली. रणजितचे मित्र प्राण येवले आणि अभिषेक ढोरे यांनीही तिला धमकावले. रणजितसोबत मैत्री केली नाही तर तुझी बदनामी करू, अशी धमकी येवले आणि ढोरे यांनी दिली. त्यामुळे तिने २४ जुलै रोजी घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड तपास करीत आहेत.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
पीडित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाइड नोट) लिहिली. संशयित रणजित देशमुख याने धमकी देत छळ केला. प्राण आणि अभिषेक यांनीही त्रास दिला. या छळाला कंटाळून आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मजकूर तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आहे.