स्मार्ट सिटीत समावेशासाठी राजकारण नको

By Admin | Updated: July 27, 2015 03:53 IST2015-07-27T03:53:10+5:302015-07-27T03:53:10+5:30

केंद्राच्या स्मार्ट सिटीत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महापालिका अधिकारी आणि पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतली

There is no politics for the inclusion of smart cities | स्मार्ट सिटीत समावेशासाठी राजकारण नको

स्मार्ट सिटीत समावेशासाठी राजकारण नको

पिंपरी : केंद्राच्या स्मार्ट सिटीत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महापालिका अधिकारी आणि पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतली. शहराचे गुणांकन वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सूचना केल्या. ‘स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा सहभागासाठी अडचण नाही. राजकारण न झाल्यास आपले शहर या योजनेत येऊ शकते, असेही पवार म्हणाले. नाव बदलून सरकार योजना राबवीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
काळभोरनगर, चिंचवड येथे बैठक झाली. त्या वेळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘गुणांचा निकष लावला, तर शहराची स्मार्ट सिटी योजनेसाठी शंभर टक्के निवड होईल. केंद्र व राज्य सरकार नावे बदलून योजना राबवीत आहे. स्मार्ट सिटीबाबत नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये विविध मते होती. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. या योजनेत निवड व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही महापालिका, जिल्हा परिषद येथे महापालिकेची सत्ता आहे. लोकहितासाठी त्यांच्या योजनांमध्ये सहभागी होत आहोत. शहरांची निवड करताना राजकीय हस्तक्षेप झाल्यास अडचण निर्माण होऊ शकेल.’’
पवार म्हणाले, ‘‘खर्चात बचत आणि उत्पन्नवाढीसाठी महापालिकेस सूचना केल्या आहेत. स्वस्तातील घर योजनेत काही अडचणी आल्याने निम्म्या लाभार्थींना घर देता आले नाही. मात्र, नवीन योजना राबविताना त्यांचा विचार पहिला करू.
पवार म्हणाले, ‘‘शहराध्यक्षांची निवड झाली आहे. अधिवेशन संपल्यानंतर शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून कार्यकारिणीबाबत निर्णय घेऊ. तसेच पात्र ठरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वीकृतवर संधी देऊ.’’
ते कोणाचे त्यांनाच विचारा
भोसरीचे आमदार महेश लांडगे राष्ट्रवादी व भाजप दोन्ही व्यासपीठावर असतात. ते कोणाचे, या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘ते कोणाबरोबर आहेत, हे त्यांनीच ठरवायचे. आपणही त्यांनाच विचारायला हवे. मला कसं काय माहिती असणार?’’ (प्रतिनिधी)

Web Title: There is no politics for the inclusion of smart cities