Pune crime : घरातले देवदर्शनला गेले असताना २० लाखांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 14:28 IST2022-11-14T14:24:49+5:302022-11-14T14:28:55+5:30
पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे...

Pune crime : घरातले देवदर्शनला गेले असताना २० लाखांची चोरी
पिंपरी : देवदर्शनाला संपूर्ण कुटुंब गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून ११ लाखांचे दागिने आणि नऊ लाखांची रोख रक्कम असा तब्बल २० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि.११) सकाळी सहा ते रविवारी (दि.१३) रात्री सव्वा बाराच्या सुमारास सोनवणे वस्ती, चिखली येथे घडली.
या प्रकरणी रविवारी (दि.१३) शरद पंडीत सोनवणे (वय ३३, रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी तुळजापूर, गाणगापूर, अक्लकोट या ठिकाणी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या खिडकीचा गज कापून खिडकीवाटे चोरट्याने घरात प्रवेश केला. तसेच पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरुममधील कपाटाचे ड्रावर उचकटून त्यामध्ये ठेवलेले ११ लाख २३ हजार रुपये किंमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने तसेच नऊ लाख रुपयांची रोख रक्कम असा २० लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.