घनकचरा विभागाने वर्षभरात ५२ हजार बेशिस्त नागरिकावर केली दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:57 IST2025-01-06T14:57:20+5:302025-01-06T14:57:40+5:30
वर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवरील कारवाईत ३ कोटी २८ लाख १८७ रुपयांचा दंड वसूल

घनकचरा विभागाने वर्षभरात ५२ हजार बेशिस्त नागरिकावर केली दंडात्मक कारवाई
पुणे : शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पुणे महापालिका दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून ५२ हजार ४०५ बेशिस्त पुणेकरांवर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. वर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवरील कारवाईत ३ कोटी २८ लाख १८७ रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या तीन वर्षांतील ही सर्वाधिक दंडवसुली आणि कारवाईची संख्या आहे.
पूणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने शहरात ९२३ क्रॉनिक स्पॉट शोधून काढले होते. या क्रॉनिक स्पॉटची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. पालिकेकडे आवश्यक असलेले मनुष्यबळ, नागरिकांकडून कचरा वर्गीकरण करून न देणे, कचरा संकलनातील अडचणी, यामुळे शहरात अनेक भागांत कचऱ्याचे ढीग कायम असल्याचे चित्र आहे. महापालिकेकडून शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी १८ पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांना स्वतंत्र वाहने देण्यात आली असून, दिवसभर ही पथके शहरात कारवाई करत असतात. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करून बेशिस्त नागरिकांंवर कारवाई केली जात आहे.या कारवाईत सर्वाधिक प्रमाण सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांचे आहे, तर अनेक नागरिक वर्गीकरण करत नसल्याने हा कचरा महापालिकेच्या संकलन यंत्रणेत देत नाहीत. ते नागरिक रस्त्यावर जागा मिळेल तिथे कचरा टाकतात. त्यामुळे हे पथक अशा व्यक्तींकडून दंड वसूल करत आहे.