मेट्रो आणि अर्बन स्ट्रीटच्या कामांमुळे उद्योगनगरीत पालखीचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:33 IST2025-06-20T17:32:23+5:302025-06-20T17:33:15+5:30

आकुर्डीतील खंडोबा माळ ते चिंचवड स्टेशन रस्त्यावरील पालखीचा मार्गच बदलला

The path of the palanquin in the industrial city is difficult due to the work of the metro and urban street. | मेट्रो आणि अर्बन स्ट्रीटच्या कामांमुळे उद्योगनगरीत पालखीचा मार्ग खडतर

मेट्रो आणि अर्बन स्ट्रीटच्या कामांमुळे उद्योगनगरीत पालखीचा मार्ग खडतर

पिंपरी : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून जात आहे. मात्र, अर्बन स्ट्रीट आणि मेट्रोच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातही महापालिकेने तात्पुरती डागडुजी करत रस्त्यावर डांबर, तर काही ठिकाणी मुरूम टाकला होता. मात्र, पावसामुळे रस्ताच उखडला आहे. तर आकुर्डीतील खंडोबा माळ ते चिंचवड स्टेशन या रस्त्यावरील पालखीचा मार्गच बदलण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली आहे.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी (दि.१९) शहरात विसावला. आज (शुक्रवारी) पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. मात्र, या मार्गावर मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातही पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पालखीच्या मार्गावर अडथळे निर्माण झाले असून वारकऱ्यांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. 

महापालिकेच्या पत्राला मेट्रोकडून केराची टोपली

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे पालखी मार्गावरील सुरू असलेले मेट्रोचे काम थांबवावे, असे पत्र महापालिकेने महामेट्रोला दिले होते. मात्र, मेट्रोने काम सुरूच ठेवले. पालखी येण्याच्या दोन दिवस अगोदर काम बंद ठेवले. त्यामुळे त्या मार्गावर कामे करण्यास महापालिकेला वेळ मिळाला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
मार्ग बदलला

खंडोबा माळ, आकुर्डी ते चिंचवड स्टेशनदरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे पालखीचा मार्ग बदलण्यात आला आहे. आकुर्डीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून पालखी मार्गस्थ झाल्यावर खंडोबा माळ येथे आल्यानंतर दरवर्षी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून जात असते. मात्र, यावर्षी तो मार्ग बदलण्यात आला असून ग्रेड सेपरेटरच्या पलीकडे असलेल्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून पुण्याकडे जाणार आहे.

अर्बन स्ट्रीटच्या कामांमुळे त्रास

महापालिकेच्या वतीने अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खडी, गट्टू आणि इतर सामान पडलेले आहे. त्याचा वारकऱ्यांना त्रास होत आहे. रस्ता खोदून ठेवल्याने पावसाच्या पाण्याने चिखल झाल्यामुळे वारकऱ्यांना चालता येत नसल्याचे दिसत आहे.

महापालिकेने पालखी मार्गावर मूलभूत सुविधा दिल्या आहेत. रस्त्यांवरील खड्डेही बुजविण्यात आले आहेत. पावसामुळे काही ठिकाणी खडी उखडली असल्याने त्यात पाणी साचले आहे. मात्र, पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे. - मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

पालखी मार्गावरील मेट्रोची कामे थांबवली आहेत. तेथील मशिनरी व इतर साहित्यही पालखी सोहळ्याला अडथळा ठरणार नाही, असे ठेवले आहेत.
- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, पुणे मेट्रो

Web Title: The path of the palanquin in the industrial city is difficult due to the work of the metro and urban street.