यमदूत धावतोय..! बेदरकार सिमेंट मिक्सर, डंपर, हायवाचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:42 IST2025-02-23T14:41:27+5:302025-02-23T14:42:12+5:30

- वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, वाहनचालकांवर लगाम घालण्याची मागणी

The messenger of Yama is running..! Useless cement mixer, dumper, highway noise | यमदूत धावतोय..! बेदरकार सिमेंट मिक्सर, डंपर, हायवाचा धुडगूस

यमदूत धावतोय..! बेदरकार सिमेंट मिक्सर, डंपर, हायवाचा धुडगूस

- महेश मंगवडे
 
काळेवाडी :
काळेवाडी, थेरगाव, रहाटणीमध्ये ठिकठिकाणी गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांना रेडिमिक्स सिमेंट काँक्रीट पुरवण्यासाठी बिल्डर, उद्योजक, स्थानिकांनी जागोजागी आरएमसी प्लांट थाटले आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक रेडिमिक्स, खडी, क्रश सॅण्ड, डबर घेऊन बेदरकार, सुसाट वाहतूक करणारे सिमेंट मिक्सर, डंपर रस्त्यावरून जणू ‘यमदूतच धावतोय’ असे बेभान धावत असतात.

गेल्या तीन-चार वर्षांत या परिसरातील मुख्य रस्त्यांवर धुडगूस घालणाऱ्या या मालवाहू वाहनांनी अनेकांना चिरडले आहे, हायवा, सिमेंट मिक्सर यांसारखी मोठी वाहने अनेकदा वेगाने धावताना अनियंत्रित होतात. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. बेदरकार वाहतूक करणाऱ्या या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचे अभय राहिले नसून पोलिस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.

परिसरात सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत अशा वाहनांना प्रवेशबंदी असतानाही ही अवजड वाहने सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. क्षमतेहून अधिक बांधकाम साहित्य भरल्याने हायवामधून रस्त्यावर माती, डस्ट, खडी तसेच सिमेंट मिक्सरमधून काँक्रीट पडलेले पाहायला मिळते. यामुळे रस्त्यांवर लहान-मोठे अपघात होतात.

सिमेंट मिक्सरने घेतला बळी

नुकताच हिंजवडी आयटी पार्कमध्ये बेभान असलेल्या सिमेंट मिक्सरमुळे दोन निष्पाप विद्यार्थिनींचा बळी गेला होता. अशा बेदरकार वाहनचालकांवर लगाम घालणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
 
अवजड वाहनांना प्रवेशबाबतच्या शहरी भागातील नियमाप्रमाणे या भागात नियमावली करून सध्या तरी चालणार नाही. मात्र, सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही लपून-छपून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची मोहीम राबविली जाईल. - बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग
 
गर्दीच्या वेळेस अशा रस्त्यावरून मिक्सर आणि हायवा सारख्या अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. वाहनचालकांची आणि मालकांचीही हिंमत वाढली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची नियमबाह्य व मनमानी पद्धतीने वाहतूक करणाऱ्या बेलगाम वाहनचालक व मालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही पोलिसांकडून अपेक्षा आहे. - शरद ठवरे, ग्रामस्थ, रहाटणी
 
वाढते अपघात अन् दुर्लक्ष

- अवजड वाहनांवरील बहुतेक चालक अनुभव नसणारे

- सर्रास वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याने ताबा सुटतो

- रस्त्यावर प्रचंड अतिक्रमणे झाल्याने अपघाताचा धोका वाढतो

- वाहनचालक सर्रासपणे मद्यपान करून वाहने चालवितात

- क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक

- वाहनांचे फिटनेस व विमा नूतनीकरण करण्याकडे मालकांचे दुर्लक्ष

Web Title: The messenger of Yama is running..! Useless cement mixer, dumper, highway noise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.