पिंपरी :भोसरी एमआयडीसी सेक्टर नंबर १० परिसरातील ऋषी पॉली बॉण्ड या प्लास्टिक मोल्डिंग करणाऱ्या कंपनीला रविवारी रात्री लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या चार तासांच्या अथक परिश्रमानंतर १०२ कर्मचारी आणि १९ गाड्यांच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. आगीचे कारण गुलदस्त्यात आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील भोसरी एमआयडीसीमधील सेक्टर १० औद्योगिक परिसरात ऋषी पॉली बॉण्ड कंपनी आहे. येथे प्लास्टिकपासून विविध वस्तू बनवण्याचा हा कारखाना असून, वाहन उद्योगाला पुरवठा करणारे सुटे भाग तयार केले जातात. याबाबत कंपनीच्या मालकांनी अद्यापही पोलिसांमध्ये कोणतीही प्रकारची माहिती दिलेली नाही. त्यामुळे आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. सायंकाळी पावणेसातला लागलेली आग रात्री साडेदहापर्यंत आटोक्यात आणली.
जीवितहानी नाही; पण...
रविवार हा सुटीचा दिवस असल्याने कंपनीमध्ये एकही कामगार नव्हता. यामुळे जीवितहानी टळली. कंपनी पूर्ण बंदिस्त स्वरूपाची आहे. त्यामुळे कंपनीच्या आतमध्ये पाण्याचा मारा करणे अवघड होते. कंपनीमध्ये प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील वस्तूंसह काही रसायने असल्याने आग भडकत असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.
या पथकाने आग आणली आटोक्यात
अग्निशामक अधिकारी ऋषिकांत चिपाडे, दिलीप गायकवाड, गौतम इंगवले, लिडिंग फायरमन विकास नाईक, प्रतीक कांबळे, विकास तोडरमल, विनायक नाळे, विठ्ठल घुसे, लक्ष्मण होवाळे, मुकेश बर्वे, मिलिंद पाटील, बाबुशा गवारी, अमोल चिपळूणकर, प्रदीप भिलारे, संभाजी दराडे, दीपक ढवळे आणि फायरमन सोमनाथ तुकदेव, नवनाथ शिंदे, विकास कडू, विनेश वाटकरे, विशाल पोटे, महेंद्र पाठक, काशीनाथ ठाकरे, अनिल माने यांच्यासह १०२ कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली.
१९ गाड्यांच्या माध्यमातून चार तास प्रयत्न
कंपनीत लागलेली आग ११ अग्निशामक दलाच्या पथकांनी चार तासांत आटोक्यात आणली. १९ गाड्यांच्या वापर केला. आगीची घटना होऊन २४ तास उलटले असले तरी, ही कशामुळे लागली, याची माहिती मिळू शकली नाही. मोशी अग्निशामक दलाच्या वतीने पाच खेपा करण्यात आल्या, तर २१ कर्मचारी होते. प्राधिकरणातील एका गाडीच्या माध्यमातून ११ जण, मुख्य अग्निशामक दलाचे २४, चिखली अग्निशामक दलाचे २२, थेरगाव अग्निशामक दलाचे ७, तळवडे अग्निशामक दलाचे १७ कर्मचारी यांनी आग नियंत्रणात आणण्यास मदत केली. त्याचबरोबर हिंजवडी अग्निशामक दलाचे एक, औंध अग्निशामक दलाचे एक, टाटा मोटर्सचे दोन, तसेच पीएमआरडीए मारुंजीच्या तीन अशा बंबांचा वापर आग आटोक्यात आणण्यासाठी केला.