Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:19 IST2025-06-15T17:15:39+5:302025-06-15T17:19:20+5:30
Bridge Collapses Over Indrayani River: इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याने पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. दोन महिन्यांपूर्वी हा पूल बंद करण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे.

Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणीनदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळल्याने वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिस, अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. हा पूल २ महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. हा पूल अनेक दशके जुना होता आणि त्याच्या जीर्ण अवस्थेमुळे तो बंद करण्यात आला होता, असे सांगण्यात येत आहे. पावसानंतर मोठ्या संख्येने लोक पुलावर जमले होते, त्यानंतर ही दुर्घटना घडली.
अनेक जण नदीत पडले आणि वाहून गेल्याची भीती आहे. पूल कोसळल्यानंतर काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंड मळा आहे. इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे. आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात. पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते. त्यावेळी अचानक लोखंडे आणि काँक्रीटमध्ये असणारा पूल कोसळला. आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदीपात्रात कोसळले.
🚨Breaking News 🚨
— 👑Che_Krishna🇮🇳💛❤️ (@CheKrishnaCk_) June 15, 2025
Bridge collapsed in Pune 's Indrayani River. Over 30 people drowned. #Kundamalapic.twitter.com/pXLWQH07kX
दरम्यान, आता या अपघातावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये सुळे यांनी लिहिले की, "पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे".
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते…
— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2025