तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा, असा झाला खुलासा; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:55 IST2025-03-07T13:53:28+5:302025-03-07T13:55:02+5:30
त्याबाबत संशयितांनी पावती दाखवली. बाजारभावापेक्षा कमी किंमत देण्याची संशयितांनी मागणी केली

तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा, असा झाला खुलासा; दोघांना अटक
पिंपरी : तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा देऊन ती तार सराफ व्यावसायिकाकडे ठेऊन त्याची फसवणूक केली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दोघांना लोणावळा येथून अटक केली.
गणेश शिवाजी भिंगारे (३६, रा. फणसडोंगरी पेण, ता. पेण, जि. रायगड), राकेश भवानजी पासड (४२, रा. अंबरनाथ वेस्ट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत गणेश दाभाडे हे सराफ व्यापारी आहेत. त्यांचे मावळ तालुक्यातील माळवाडी इंदोरी येथे हरी ओम ज्वेलर्स हे दुकान आहे. सोमवारी (दि. ३) दोघेजण दाभाडे यांच्या दुकानात आले. त्यांनी दाभाडे यांना बनावट सोन्याची चेन खरी असल्याचे भासवून दाभाडे यांना दिली.
त्याबाबत संशयितांनी पावती दाखवली. बाजारभावापेक्षा कमी किंमत देण्याची संशयितांनी मागणी केली. आपला फायदा होत असल्याने दाभाडे यांनी ती चेन घेऊन संशयितांना ७० हजार रुपये दिले. त्यानंतर दाभाडे यांनी चेन घासून बघितली असता ती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयितांचा माग काढला. संशयितांना लोणावळा येथून अटक केली. दाभाडे यांची फसवणूक करून मिळालेले ७० हजार रुपये संशयितांनी आपसात वाटून घेतले होते. त्यांच्याकडून ७० हजार रुपये हस्तगत करण्यात आले.
संशयित तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा देत आणि ते खरे सोने असल्याचे भासवून ते सराफ व्यावसायिकाकडे गहाण ठेवत असत. पोलिस उपनिरीक्षक विवेक गोवारकर, पोलिस अंमलदार अनंत रावण, ज्ञानेश्वर सातकर, भीमराव खिलारे, विनायक शेरमाळे, स्वराज साठे, रमेश घुले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.