निगडेत यात्रेतील वादातून तलवार हल्ला; चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:37 IST2025-02-16T13:36:52+5:302025-02-16T13:37:22+5:30

पिस्तूल दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण

Sword attack in Nigde over dispute during yatra; Four arrested | निगडेत यात्रेतील वादातून तलवार हल्ला; चौघांना अटक

निगडेत यात्रेतील वादातून तलवार हल्ला; चौघांना अटक

वडगाव मावळ : गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चौघांनी पिस्तूल दाखवून एकावर तलवार व लाकडी दांडक्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी निगडे (ता. मावळ, जि. पुणे) हद्दीत घडली. जखमी संतोष मारुती करवंदे (वय ४०, रा. कल्हाट, ता. मावळ, जि. पुणे) यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष महादू जाचक (३५, रा. स्वराज्य नगरी, फ्लॅट क्र. ४, स्वामी दर्शन अपार्टमेंट, तळेगाव दाभाडे, मूळ रा. करवंदे वस्ती कल्हाट, ता. मावळ), आदिनाथ लाला खापे (२७, रा. कोंडीवडे, ता. मावळ), रोहन मुरलीधर आरडे (२३) व ओमकार देवीदास खांडभोर (२३, दोघे रा. घाटेवाडी, पोस्ट वडेश्वर, ता. मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडेत संतोष करवंदे मोटारीतून (एमएच १४ एलवाय २८४२) तानाजी भगवान करवंदे, विनोद दादाभाऊ कोयते व नवनाथ बापू देशमुख यांच्यासोबत कल्हाटकडे जात असताना संतोष जाचक, आदिनाथ खापे, रोहन आरडे व ओमकार खांडभोर आदींनी गावच्या यात्रेत झालेल्या वादाच्या कारणावरून करवंदे यांच्या मोटारीच्या आडवी मोटार लावून थांबवले आणि मोटारीच्या काचा फोडल्या. संतोष जाचक याने पिस्तूल दाखवून मोटारीमधून खाली उतरण्यास भाग पाडले.

संतोष जाचक व तिघांनी तलवार व लाकडी दांडक्याने डोक्यावर व शरीरावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. त्यांना पोलिसांनी अटक केले आहे. जखमी संतोष करवंदे यांना सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: Sword attack in Nigde over dispute during yatra; Four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.