पिंपरीत पोलीस कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: March 28, 2023 19:00 IST2023-03-28T19:00:17+5:302023-03-28T19:00:30+5:30
पोलीस दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला असता ते अंथरुणावर निपचित पडल्याचे दिसून आले

पिंपरीत पोलीस कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यू
पिंपरी : एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस लाइन येथे मंगळवारी (दि. २८) सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत्यूचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. पोलीस नाईक रतन कांबळे (वय ३८) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक रतन कांबळे हे मूळचे उमरगा तालुक्यातील होते. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात पोलीस मुख्यालय, निगडी येथे ते नेमणुकीस होते. कांबळे यांनी मंगळवारी सकाळी दार उघडले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला असता कांबळे अंथरुणावर निपचित पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी कांबळे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.