भिशीच्या पैशांसाठी ट्रक चोरणाऱ्या ‘एसटी’च्या बस ड्रायव्हरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 02:48 PM2020-10-16T14:48:55+5:302020-10-16T14:52:55+5:30

डिझेल संपले अन् प्लॅन फसला....

The ST bus driver who stolen the truck for money was arrested | भिशीच्या पैशांसाठी ट्रक चोरणाऱ्या ‘एसटी’च्या बस ड्रायव्हरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भिशीच्या पैशांसाठी ट्रक चोरणाऱ्या ‘एसटी’च्या बस ड्रायव्हरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखेकडून दोघांना अटक : ट्रकसह ११ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्तदोन्ही आरोपींना 18 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

पिंपरी : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा बस चालक असलेल्या एकाने भिशीचे पैसे भरण्यासाठी चक्क लोखंडी स्टीलने भरलेला ट्रक चोरला. ट्रकच्या मूळ चालकाने यासाठी त्याला साथ दिली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मूळ ट्रक चालक आणि त्याचा साथीदार असलेला बस चालक या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना 18 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शशिकांत आजिनाथ माने (वय 35, रा. मोरेवस्ती, चिखली), विकास राजुरकर (वय 42) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांकडून ट्रक आणि लोखंडी स्टील असा एकूण 11 लाख 66 हजार 777 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान नवनाथ खरात (वय 30, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, खरात यांचा ट्रक ड्रायव्हर विकास राजूरकर जालना येथून 23 टन लोखंडी स्टील घेऊन 12 ऑक्टोबर रोजी चिखलीत आला. त्याने पहाटे पाचच्या सुमारास त्याच्या हरगुडे वस्ती येथील घरासमोर ट्रक लावला आणि घरी गेला. त्यानंतर त्यांचा ट्रक अज्ञाताने चोरून नेला. 

गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू झाला. कारेगाव - केडगाव - दौंड रस्त्यावर लोखंडाने भरलेला ट्रक एका हॉटेलच्या समोर लावला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना मयूर हॉटेल समोर ट्रक मिळून आला. ट्रकच्या केबीनमधील आरोपी शशिकांत माने याच्याकडे चौकशी केली. मूळ चालक विकास राजूरकर याच्या सांगण्यावरून ट्रक चोरून आणल्याचे त्याने सांगितले. 
 
12 ऑक्टोबर रोजी आरोपी विकास हा स्टील भरण्यासाठी जालना येथे गेला. जालना येथून येत असताना दोन्ही आरोपींनी ट्रक चोरण्याचा प्लॅन केला. माने याला भिशीचे 15 हजार रुपये भरायचे होते. दोघांनी जालना जवळ ट्रकमधील काही स्टील विकले आणि त्या पैशांची दारू प्यायली. आरोपी विकास हा स्टील भरून चिखली येथे आला. ठरल्याप्रमाणे विकास ट्रक लावून घरी गेला आणि शशिकांत ट्रक चोरून घेऊन गेला.

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक फौजदार रवींद्र गावंडे, सुभाष सावंत, पोलीस कर्मचारी मारूती जायभाये, अंजनराव सोडगिर, विजय मोरे, सचिन मोरे, प्रमोद गर्जे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

डिझेल संपले अन् प्लॅन फसला
शशिकांत हा मूळचा जामखेडचा असून गेल्या पाच वर्षांपासून तो एसटी महामंडळाच्या ठाणे आगारात बस चालक म्हणून नोकरी करत आहे. लॉकडाऊन पासून तो कामावर जात नव्हता. भिशीचे पैसे भरण्यासाठी तसेच घरखर्चासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने विकाससोबत मिळून ट्रक चोरण्याचा प्लॅन केला. ट्रक चोरल्यानंतर माने याच्याकडे ट्रकमध्ये डिझेल भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो एका हॉटेल समोर ट्रक लावून थांबला होता. डिझेलसाठी आरोपी विकास हा पैसे घेऊन येणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी दोघांना जेरबंद केले.

Web Title: The ST bus driver who stolen the truck for money was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.